औरंगाबाद : शहरात सर्रासपणे गांजा विकणारा जावेद खान आयुब खान यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी, २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना ७ ऑगस्ट २०१७ रोजी नूतन कॉलनी परिसरातील अजबनगरात गांजा विक्री करण्यासाठी एक तरुण पिशवी घेऊन रस्त्यावर थांबला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सावंत यांच्या पथकाने रात्री आठ वाजेच्या सुमारास सापळा रचून तरुणास ताब्यात घेतले. त्याची चौकशी आणि पिशवीची झडती घेतली असता त्यात गांजा आढळून आला.
अजबनगरात राहणारा जावेद खान अयुब खान याच्या ताब्यातून दोन किलो १८२ ग्रॅम गांजा, मोबाइल, रोख दोन हजार १७० रुपये असा ११ हजार ६८२ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस शिपाई सुधाकर राठोड यांच्या तक्रारीवरुन जावेद खान अयुब खान विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सहायक पोलीस निरीक्षक अखमल शेख यांनी तपास करून जावेदखान विरोधात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणाची अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता बी. आर. लोया यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने जावेद खानला दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी, २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.