छत्रपती संभाजीनगर : ‘जिगीषा’च्या ४० व्या वर्धापन दिनापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित होणारा नाट्य महोत्सव यंदा २२, २३ व २४ ऑगस्ट रोजी होत आहे. महात्मा गांधी मिशन आणि ‘मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाउंडेशन’ या संस्थांच्या सहयोगाने साजऱ्या होणाऱ्या या नाट्य सहवासाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. या वर्षीच्या महोत्सवाचे उद्घाटन २२ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे.
एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृह येथे आयोजित या महोत्सवात गतवर्षीपासून ‘जिगीषा’तर्फे ‘मिलिंद सफई पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. नोकरी, उपजीविका सांभाळून रंगभूमीवर सातत्याने काम करणाऱ्या रंगकर्मीची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. या वर्षी हा पुरस्कार अभिजित झुंझारराव या दिग्दर्शक-अभिनेत्याला जाहीर करण्यात आला आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात हा पुरस्कार सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. या प्रसंगी अंकुशराव कदम, नंदकिशोर कागलीवाल, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, डॉ. आशिष गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
उद्घाटन समारंभानंतर सतीश आळेकरलिखित आणि अनुपम बर्वेदिग्दर्शित ‘ठकीशी संवाद’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. यात सुव्रत जोशी, गिरिजा ओक हे कलावंत आहेत. तत्पूर्वी याच परिसरात नाट्यविषयक पुस्तकांचे अभिनव पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.दुसऱ्या दिवशी ‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे’ या पुस्तकातील निवडक प्रकरणांचे अभिवाचन प्रतीक्षा लोणकर व चंद्रकांत कुलकर्णी सादर करतील. जयेश आपटे दिग्दर्शित आणि पर्ण पेठे, सिद्धेश पूरकरअभिनीत ‘तोत्तोचान’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.
२४ ऑगस्ट रोजी ‘नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे अभिवाचन अजय अंबेकर आणि ज्योती अंबेकर सादर करतील. रात्री संत एकनाथ नाट्यगृहात क्षितिज पटवर्धनलिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ हे नाटक सादर करून महोत्सवाचा समारोप होईल.