छत्रपती संभाजीनगर : ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टल चर्चिल यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याविषयी केलेल्या व्यंगात्मक टिपप्णीचे स्मरण व्हावे, अशी ‘हवा’ शहरांमध्ये आली आहे. पेट्रोल पंपांवर बंधनकारक केलेले नि:शुल्क हवेचे यंत्र आता बंद आणि दुचाकी-चारचाकींच्या टायरांसाठी ५० ते १०० रुपये शुल्क घेणाऱ्या नायट्रोजन गॅस हवेचे यंत्र सुरू, असे चित्र हळूहळू दिसू लागले आहे.

त्याला विशुद्ध हवा, इंधन बचत करते आणि टायर गरम न होता त्याचे आयुष्य वाढते, अशी जोड देऊन नायट्रोजन गॅस हवेच्या व्यवसायाची ‘हवा’ पसरवली जात आहे. ‘समृद्धी’वर मात्र, नायट्रोजन हवा नि:शुल्क उपलब्ध असणारे काही पेट्रोलपंप असल्याचा दावा महामार्ग पोलिसांकडून केला जातो.

शहरातील क्रांती चौक, हर्सूल, जाधववाडी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारानजीकच्या व अन्य काही महत्त्वाच्या ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर नायट्रोजन गॅस हवा भरण्याची यंत्रणा बसवण्यात आली आहे. साधारण ७० हजार ते अडीच लाख रुपये किमतीची ही यंत्रणा असल्याचे पेट्रोलपंप चालक सांगतात. या यंत्रणेतून भरण्यात येणारी नायट्रोजन गॅस हवा दुचाकीमध्ये भरायची असेल तर ५० रुपये, तीन चाकी ऑटो रिक्षा किंवा तत्सम वाहनांसाठी ७५ रुपये तर चारचाकी वाहनांच्या टायरसाठी १०० रुपये आकारले जात आहेत.

हवेत ७८ टक्के नायट्रोजन असते. परंतु टायरमध्ये वापरले जाणारे नायट्रोजन शुद्ध स्वरूपात म्हणजे ९०-९५ टक्के भरले जाते. ऑक्सिजनपेक्षा नायट्रोजनचे रेणू मोठे असल्याने ते टायरमधून हळूहळू बाहेर पडतात म्हणून हवा अधिक काळ टिकते, असे सांगितले जाते. त्या जोडीला इंधनाच्या प्रति लिटरमधून (मायलेज) जादा अंतर कापले जाऊ शकत असल्यामुळे बचतही होते, सुसाट धावण्यामुळे गरम होणाऱ्या टायरचेही तापमान स्थिर (ऑक्सिडेशन) राहून त्याचे आयुष्य वाढते, असे दावे केले जात आहेत.

आपल्या क्रांती चौकातील पेट्रोलपंपावर नायट्रोजन गॅस हवेची अडीच लाखांची प्रत्येकी दोन यंत्रे बसवली आहेत. शहरातील इतरही काही पंपांवर ही यंत्रे आहेत. समृद्धीवर धावणाऱ्या वाहनांसाठी नायट्रोजन हवेच्या सूचना असल्यामुळे ग्राहक तशी मागणी करतात. टायरचे तापमान वाढत नाही, इंधनही बचत आणि अधिक काळ हवा टिकते, असे ग्राहक अनुभव सांगतात. – अकील अब्बास,अध्यक्ष, पेट्रोलपंप चालक संघटना

नायट्रोजन हवेच्या सूचना, नि:शुल्क उपलब्ध

समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांसाठी नायट्रोजन गॅस हवा शासनाने मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. काही पेट्रोल पंपांवर मोफतही हवा भरून मिळते. शासन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडूनही नायट्रोजन गॅस हवा भरण्याविषयीच्या सूचना आहेत. – किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस