मृत श्रीकांत शिंदे प्रकरण

औरंगाबाद : शिवजयंतीच्या मिरवणुकीत झेंडा फिरविण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून श्रीकांत शिंदे याचा चाकू भोसकून खून केल्याप्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी राहुल सिद्धेश्वर भोसले व ऋषिकेश बाळू काळवणे यांनाही अटक केली. राहुलला गुरुवारी रात्री उशिरा मुंबईतून तर ऋषिकेशला गारखेडा भागातूनच शुक्रवारी उचलले. या प्रकरणात गुरुवारी पहाटेच विजय ऊर्फ छोटू शिवाजी वैद्य याला अटक करण्यात आली होती. या तिन्ही आरोपींना प्रथम न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी मंगळवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

श्रीकांत शिंदे याच्या मारेक ऱ्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा पुंडलिकनगर परिसरातील नागरिकांनी बुधवारी रात्रीपासून घेतल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत विजय वैद्य याला औरंगाबादमधूनच अटक केली होती. तर घटना घडल्यानंतर राहुल भोसले हा खासगी वाहनाने पुण्याला पसार झाला होता.

राहुलच्या मागावर पोलीस होतेच. त्याचा ठावठिकाणा पोलिसांना लागला असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मृत श्रीकांत शिंदेच्या नातेवाइकांना सांगितल्यानंतर ते शांत झाले होते. गारखेडा परिसरातील हुसेन कॉलनीत राहणाऱ्या श्रीकांत गोपीचंद शिंदे याचा शिवजयंती मिरवणुकीत झेंडा फडकवण्यावरून वाद झाल्यानंतर अटकेत असलेल्या विजय व राहुल यांनी त्याच्या छातीत चाकू भोसकल्यानंतर मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृत श्रीकांत शिंदेचा भाऊ सूरज याच्या फिर्यादीवरून विजय वैद्य व राहुल भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीत ऋषिकेश काळवणेचेही नाव घेतल्याने पोलिसांनी त्याला गारखेडा परिसरातून अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील राहुल हा बीड बायपास रोडवरील एका महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.