मराठवाडय़ातील राजकीय नेतृत्व थोडे समंजसपणे वागले असते, तर त्यांनी हा भाग ऊसक्षेत्र होऊ दिला नसता, या शब्दांत टीका करीत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी दुष्काळ मुक्तीसाठी प्रवाहाचा वेग कमी करणे हे सोपे उत्तर असल्याचे सांगितले.
अनंतराव भालेराव स्मृती पुरस्काराने शनिवारी त्यांना गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. हरितक्रांतीनंतर मिळालेल्या अनुदानाचा उपयोग विहिरी खणण्यासाठी करून घेतला. त्यात पाणी येईना म्हणून कूपनलिकांनी पाणी उपसले. मग पाणीच संपले. ते पुन्हा जिरवण्यास प्रवाहाचा वेग कमी करीत वेगवेगळ्या प्रकारचे बंधारे बांधले. परिणामी अडीच लाख विहिरींचे पुनर्भरण झाले. हे काम एकटय़ा राजेंद्रसिंह यांचे नव्हते तर समाजाने हे काम उभे केले होते. असे काम उभे करताना संयम आवश्यक असतो, असे सांगत त्यांनी दुष्काळी मराठवाडय़ातही पाणी बचतीचा संकल्प करण्याचे आवाहन केले. मराठवाडय़ात जलसाक्षरता अभियान सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी मान्यवरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
समाज नदीबरोबर जोडला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इतिहास बदलायला वेळ लागत नाही. पण भूगोल बदलायचा असेल तर संयम लागतो. तो संयम पाण्याच्या कामात राहावा, या साठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असेही ते म्हणाले. डॉ. सविता पानट यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्षीय भाषण मधुकरअण्णा मुळे यांनी केले. न्या. नरेंद्र चपळगावकर, सुधीर रसाळ, पत्रकार संजीव कुळकर्णी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
शिरपूर पॅटर्नवर सूचक टीका
शिरपूर पॅटर्नमध्ये खोलीकरण किती केले जावे यावरून वाद आहेत. या बाबत प्रश्नोत्तरातील सत्रात बोलताना राजेंद्रसिंह म्हणाले की, जमिनीवर अन्याय केला तर त्याचे परिणाम पाहावयास मिळतात. जमिनीच्या पोटातील थरांना धक्का लागेल तेवढय़ा खोलीकरणाची गरज नसते, असे सांगत त्यांनी शिरपूर पॅटर्नवर सूचक टीका केली.
चच्रेवरचा एक प्रश्न
व्यासपीठावरून राजेंद्रसिंह राणा वारंवार पाण्यावर काम करण्याचा संकल्प करा, असे आवाहन करीत होते. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू बी. ए. चोपडे यांनी विद्यापीठाचा ८०० एकर परिसर जलयुक्त करण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. १० कोटी लिटर पाणी साठविण्याचा प्रयोग हाती घेतला असल्याचे सांगितले. उपस्थितांमधील माधव चितळे यांनीही बोलावे, असा आग्रह या वेळी राजेंद्रसिंह यांनी धरला. त्यावर माधवराव यांनी, राजेंद्रसिंह यांनी ८ हजार चौरस क्षेत्रावर उत्कृष्ट काम उभे केले. मराठवाडा ६० हजार चौरस क्षेत्राचा भाग आहे. त्यांच्यासारखे काम उभे करायचे असेल तर किती राजेंद्रसिंह लागतील? असा सवाल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajendrasinh rana anantrao bhalerao award