छत्रपती संभाजीनगर : शिक्षकांनंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या संदर्भात नुकताच शासन निर्णय झाल्याची माहिती येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत शुक्रवारी देण्यात आली.
रफिक झकेरिया शैक्षणिक संस्थेच्या आवारात राज्यातील सर्व जिल्ह्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे व बालभारतीचे अध्यक्ष व सचिवांसाठी आयोजित या कार्यशाळेस शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, संजय यादव, राहुल रेखावार यांच्यासह राज्य स्तरावरील इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षणमंत्री दादा भुसे व राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे ठरले होते. मात्र, हे दोन्हीही मंत्री उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते, त्याविषयी विचारले असता शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी मंत्री भुसे हे शनिवारच्या सत्रांमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.
पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षकेतर कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक आदी पदे भरण्याचा नुकताच निर्णय झाला असल्याचे सकाळच्या सत्रातील कार्यशाळेत सांगण्यात आले. तसेच मागील २०-३० वर्षांत जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्ता ढासळल्याचे सांगून आता गुणवत्ता सुधारण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली. पालक त्यांच्या पाल्यांसाठी जवळच्या शाळेला नाही तर गुणवत्तापूर्ण शाळेला प्राधान्य देत असल्याचे सांगण्यात आले.
‘निपुण -महाराष्ट्र’ ‘विद्या समीक्षा केंद्र (व्हीएसके)’ शालांत प्रणाली व पॅट आदी यंत्रणांचाही आढावा कार्यशाळेत घेण्यात आला. ‘निपुण महाराष्ट्र’मध्ये ४० लाख पालक जोडले असून, ही संख्या दीड कोटींपर्यंत नेण्यात येऊ शकते, असे यावेळी सांगण्यात आले. पहिलीपासूनच विद्यार्थ्यांचे आधारकार्ड मान्यता घेण्याच्या (व्हॅलिड) सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या घटल्याचा मुद्दा आधारकार्ड व्हॅलिड नसल्याशी जोडून शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्ता टिकून ठेवण्याला प्राधान्य देण्यासह पालकांना निपुण महाराष्ट्रमध्ये सहभागी करून घेण्यासाठी काम करणे गरजेचे असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. या अंतर्गत राज्यामध्ये दोन कोटी अकरा लाख विद्यार्थी असून एक लाख आठ हजार शाळा आहेत, तर सात लाख ४३ हजार एकूण शिक्षक आहेत, असे एका तक्त्याच्या आधारे दर्शवण्यात आले.