औरंगाबाद : सातवीतील विद्यार्थिनींना अश्लील चित्रफीत दाखवणारा शिक्षक किरण परदेशी याला निलंबित करण्यात आले आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून शुक्रवारी त्याची कोठडी संपणार आहे.

औरंगाबाद शहरातील सिडको भागातील एन-७ मधील एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेला किरण परदेशी हा मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील चित्रफीत दाखवत असल्याचे मागील आठवडय़ात समोर आले. या संदर्भातील तक्रार पोलीस आयुक्तांकडे आल्यानंतर दामिनी पथकाने या प्रकरणाचा छडा लावत आणि विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन किरण परदेशी याच्या घृणास्पद कृत्यांवरचा पडदा दूर केला आहे. यानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थिनींच्या पालकांना दम भरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दामिनी पथकातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांचे समुपदेशन केल्यानंतर मंगळवारी सिडको पोलीस ठाण्यात किरण परदेशीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बुधवारी त्याला न्यायालयात उभे केल्यानंतर विशेष न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी किरण परदेशीला शुक्रवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. अश्लील चित्रफीत दाखवण्याच्या प्रकरणामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती.