औरंगाबाद : रस्त्यात उभ्या एका ट्रकवर जीप आदळून झालेल्या अपघातात चार जण ठार तर आठ जण जखमी झाले. ही घटना औरंगाबाद-जालना महामार्गावरील गाढेजळगावजवळ शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. मृत व जखमी हे नाशिक जिल्ह्यतील इगतपुरी येथून देवदर्शन करून गावी सिंदखेडराजाकडे परतत असताना ही दुर्घटना घडली.

अपघातात काशिनाथ देवराव म्हेत्रे (वय ६२), रवी बबन जाधव (दोघेही रा. नशिराबाद, ता. सिंदखेडराजा), ऋजिंदर देवराव तिडके (गोंदेगाव ता. जालना) व संगीता गणेश बुंदे (तांदुळवाडी ता. सिंदखेडराजा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पुंडलिक देवराव म्हेत्रे, भीमराव देवराव म्हेत्रे, कमला काशिनाथ म्हेत्रे, अर्चना रवी जाधव, सुभिद्राबाई लक्ष्मण म्हेत्रे, सिंधुबाई संतोषराव कड (रा. मलनी, ता. सिंदखेडराजा), संस्कृती गणेश बुंदे, गणेश दिगंबर बुंदे व संजय दलसिंग मरमठ (रा. सिंदखेडराजा) हे जखमी झाले आहेत. जखमींवर औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात एवढा भीषण होता की रस्त्यात उभ्या ट्रकवर भाविकांची जीप आदळताच मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून परिसरातील गाढेजळगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काहींनी करमाड पोलिसांना अपघाताची माहिती दिली. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांसह जखमींना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. मृत व जखमी हे दोन दिवसांपूर्वी इगतपुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.