छत्रपती संभाजीनगर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांच्या बैठकीत मंगळवारी चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळावरूनच ‘गाढव’ शब्द उच्चारण्यात आला. त्यावरून पुन्हा जोरदार खडाजंगी झाली. ‘गाढव’ हा शब्द संसदीय आहे का, असा प्रश्न उपस्थित करून काही सदस्य आक्रमक झाले. अखेर विद्यापीठ प्रशासनाकडून ‘गाढव’ शब्द मागे घेत असल्याचे निवेदन करण्यात आल्यानंतर बैठक पुढे सुरू झाली. मात्र, यावेळी ‘नुरा कुस्तीचा आखाडा’ असल्याचा आरोप केल्याने आणि एका सदस्याच्या प्रश्नावर तब्बल दीड तास काथ्याकूट झाल्याने बैठक वादळी ठरली.
विद्यापीठाची अधिसभा प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेत पार पडली. ही सभा होण्यापूर्वीच सदस्यांनी विद्यापीठात हुकूमशाही सुरू आहे, म्हणत बैठक वादळी ठरणार याचे संकेत काही सदस्यांनी दिले होते. काही सदस्यांनी दिलेल्या प्रस्तावांचा समावेश न करता, ठराविकच प्रस्ताव विचारात घेतले जातात, या मुद्यावरूनही धुसफूस सुरू होती.
प्र-कुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे यांनी विद्यापीठ काय करते आहे, हे वाचन करण्यास सुरुवात करताच, इतके भव्य दिव्य उपक्रम होत आहेत, तर मग विद्यापीठाचे राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) क्रमांक का घसरला म्हणून सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. यावर ठोस उत्तर न देता लिखित उत्तर दिल्याचे सांगत विद्यापीठ प्रशासनाने सावरासावर केली.
तर प्रा. सुनील मगरे यांनी पदव्युत्तर महाविद्यालयांच्या तपासणीत भेद भाव केल्याचा आरोप केला. एका अहवालामध्ये सकारात्मक आणि दुसऱ्यामध्ये नकारात्मक का ? सुविधा असतांनाही मुद्दाम चांगल्या शिक्षण संस्थांना बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप मगरे यांनी केला. अजूनही प्रवेश सुरू आहेत. ऑक्टोंबरपर्यंत प्रवेश आणि डिसेंबरमध्ये परीक्षा अशी विद्यापीठाची वार्षिक कालदर्शिका असून, ती बिघडल्याचेही मगरे म्हणाले.
डॉ. उमाकांत राठोड यांनी आमचे प्रस्ताव, मुद्दे समाविष्ट नाहीत, असे सांगत विद्यापीठ गीताचा विस्तार करण्याचा ठराव मांडला. विद्यापीठाचे विद्यमान गीतही चांगले असले तरी त्यामध्ये नागसेन वन, नामांतर आंदोलन आणि प्रत्यक्ष झालेले नामांतर, हे अधोरेखित होत नसल्याचे सांगितले. त्यावर यासाठी एक प्रक्रिया असते, राज्यपाल कार्यालयास कळवून तज्ज्ञांच्या मदतीने गीत विस्तारीकरण करावे लागेल, अधिसभेची मान्यता घ्यावी लागेल, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
गाढव संसदीय शब्द का ?
गोंधळ वाढत गेल्याने इतर काय गाढव आहेत का ? गप्प बसा असे सुनावताच सदस्य अन् प्रशासनात चांगलीच खडाजंगी झाली. डॉ. उमाकांत राठोड अन् संजय कांबळे या सदस्यांनी आवाज उठवत, तुम्हाला मूळ प्रश्न सोडवायचे नाहीत, संसदीय भाषा वापरा म्हणता मग ‘गाढव’ हा संसदीय शब्द आहे का ? असे सवाल-जवाब सरबत्ती सदस्य अन् विद्यापीठ अधिकाऱ्यांमध्ये रंगले.
अतिवृष्टीचा विसर
कुलगुरु, प्र-कुलगुरु विद्यार्थ्यांना भेट नाहीत, असा प्रश्न दत्ता भांगे यांनी उपस्थित केला. मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे, त्याचा विसर नको. परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी केली. त्यावर कुलगुरू डाॅ. फुलारी यांनी शासनाकडे शिफारस करण्यात येईल, असे उत्तर दिले. तर परीक्षांमधील प्रश्नपत्रिकांचे फेरतपासणीनंतरचे निकाल वेळेत लागत नसल्यानेही सदस्यांनी परीक्षा संचालकांना धारेवर धरले.