तीन महिन्याचा पगार थकित असल्यामुळे वैजापूर तालुक्यातील संतप्त शिक्षकांनी पंचायत समिती कार्यालयात जाऊन आंदोलन केले. त्यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयत डांबून ठेवून पगार मिळत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना घरी जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. तब्बल दोन तास शिक्षकांनी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले होते. गटविकास अधिकाऱ्यांनी थकित पगार लवकरात लवकर दिला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर शिक्षकांनी आंदोलन स्थगित केले.

वैजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३२४ शाळा आहेत. त्यामध्ये १, २५५ शिक्षक अध्यापनाचे काम करतात. चालू महिन्यासह तीन महिन्याचा त्यांचा पगार थकलेला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. शिक्षक सातत्याने अधिकाऱ्यांकडे थकीत पगाराबाबत पाठपुरावा करत होते. मात्र, पंचायत समितीचे अधिकारी पगाराच्या मुद्यावर टोलवाटोलवी करत होते. गेल्या काही दिवसांपासून अधिकारी वर्ग पगाराच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षक संघटनांनी अखेर आक्रमक पाऊल उचलले. गटविकास अधिकारी सैय्यद यांच्यासह कर्मचाऱ्यांना त्यांनी कार्यालयात कोंडून ठेवून प्रशासनाविरोधात आंदोलन केले.

पगार मिळत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांना घरी जाऊ देणार नसल्याची भूमिका शिक्षकांनी घेतली होती. या प्रकरणात पंचायत समिती गट विकास अधिकारी पुष्पा मनचंदा यांनी मध्यस्थी केल्यामुळं तणाव निवळला. बजेट आलेले आतानाही आमचा पगार होत नाही. जिल्ह्यातील बाकीच्या तालुक्याचे पगार झाले आहेत. मात्र आमचे पगार अडवले जात आहेत. त्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण झाल्याचं शिक्षकांनी यावेळी सांगितले. मनचंदा यांनी शिक्षकांसोबत दोन तास चर्चा केली. गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून धनादेश पारित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिक्षकांचा राग शांत झाला.