पोलिसांनी मोर्चा रोखून कामगारांना ताब्यात घेतले

विविध मागण्यांसाठी पैठण रोडवरील धूत यांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्यास निघालेल्या व्हिडीओकॉनच्या कामगारांना गुरुवारी पोलिसांनी गुलमंडीवर ताब्यात घेतले. पोलिसांनी कामगारांना काही वेळ ठाण्यात बसवून नंतर सोडून दिल्याचे अ‍ॅड. कॉ. अभय टाकसाळ यांनी सांगितले.

व्हिडीओकॉन ग्रुपमधील ऑटोकार्सच्या कामगारांचे मागील ७१ दिवसांपासून उपोषण सुरू असून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे गुरुवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीने ५८ हजार ७३० कोटी रुपयांचे कर्ज ५० बँकांकडून घेतले व ते बुडवले, असा आरोप कामगारांच्या नेतृत्वाकडून करण्यात आला. धूत बंधूंवर गुन्हा दाखल करावा, कामगारांचा गेल्या वर्षभरापासून थकीत असलेला पगार द्यावा, आदी मागण्यांसाठी ३४० कामगार ७१ दिवसांपासून उपोषण करत आहेत. यापूर्वी भीक मांगो आंदोलनही केले आहे. त्या माध्यमातून धूत बंधूंना ७२१ रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आले होते, असे सांगत शिवसेनेचा कामगारांबाबतच्या धोरणाला पाठिंबा आहे का, असा प्रश्नही कामगारांनी उपस्थित केला. शिवसेना पक्षप्रमुखांनाही याबाबत पत्र पाठवले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व अ‍ॅड. अभय टाकसाळ, शेख कय्युम शेख रज्जाक, गजानन खंदारे आदींनी केले. सुमारे १०० ते १२५ कामगारांचा मोर्चा सकाळी ११ वाजता गुलमंडीवरून निघाला. मात्र काही वेळातच पोलिसांनी कामगारांना ताब्यात घेतले. अटक करून नंतर सोडून देण्यात आले.

..हा कंपनीच्या बदनामीचा हेतू

व्हीआयएल समूहातील विविध कंपन्यांमधील कामगार संघटनांच्या सभासदांचा वेळोवेळी पगार न्यायालयाद्वारे नियुक्त ठरावाद्वारे होतो. व्हीजीईयू ही संघटना पूर्वी ऑटो कार्स एम्प्लॉईज युनियन या नावाने कार्यरत होती. परंतु संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिशाभूल करून त्यात ‘व्हिडीओकॉन’ या नावाचा समावेश केला आहे. हा कंपनीला बदनाम करण्याचा उद्देश आहे. कंपनीकडून त्यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोणत्याही गैरप्रकाराला बळी पडू नये, असे व्हिडीओकॉनचे जनसंपर्क अधिकारी ज्योतीशेखर यांनी कळवले आहे.