भारतातील सर्वात मोठी कार निर्माता असलेली कंपनी मारूती सुझुकी लवकरच आपली सगळ्यात प्रीमियम कार ५ जुलै रोजी लॉन्च करणार आहे. कंपनी आजवरची सर्वात मोठी कार मारूती सुझुकी Invicto लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग होण्यापूर्वी १९ जून म्हणजेच आजपासून कारच्या बुकिंगला सुरूवात झाली आहे. मारूती सुझुकी आणि टोयोटो यांच्या भागीदारीमध्ये तयार करण्यात आलेली ही चौथी कार असणार आहे.

लवकरच लॉन्च होणाऱ्या Invicto MPV च्या बुकिंगला आजपासून सुरूवात झाली आहे. ग्राहक २५,००० रुपयांमध्ये या कारचे बुकिंग करू शकतात. ग्राहक याचे बुकिंग मारूती सुझुकीची अधिकृत वेबसाईट, नेक्सा डिलरशिप चेनद्वारे करू शकतात. Invicto ही कंपनीच्या ब्रँडचे पहिले मॉडेल असेल ज्याची किंमत २० लाखांपेक्षा जास्त असेल. याबाबतचे वृत्त autocarindia ने दिले आहे.

हेही वाचा : लवकरच लॉन्च होणार मारूती सुझुकी MPV Invicto; जाणून घ्या डिझाईन आणि फीचर्स

Invicto चे डिझाईन आणि फीचर्स

Invicto ही नवीन कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉस MPV आधारित असणार आहे. मारूती सुझुकीने या महिन्यात अधिकृतपणे कारच्या लॉन्चिंगबद्दल पुष्टी केली आहे. यामध्ये डिझाईनमध्ये किरकोळ बदल होऊ शकतात. ज्यामध्ये सुझुकीच्या लोगोसह एक नवीन ग्रील आणि पुन्हा नव्याने डिझाईन केलेले अलॉय व्हील्सचा समावेश आहे. फीचर्सच्या बाबतीत या प्रीमियम MPV कारमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीसह १०. १ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, एक मोठा पॅनोरॅमिक सनरूफ मिळणार आहे. तसेच Advance असिस्टन्स सिस्टीम (ADAS ) चा सपोर्ट मिळणार आहे.

लवकरच लॉन्च होणाऱ्या Invicto इनोव्हा हायक्रॉससह पॉवरट्रेनचा पर्याय मिळणार आहे. यामध्ये २.० लिटर, चार सिलेंडरचे पेट्रोल इंजिन मिळेल. जे १७१ बीएचपी आणि २०५ एनएम टॉर्क जनरेट करते. ज्याला CVT सह जोडण्यात आले आहे. दुसरे पॉवरट्रॅम एक TNGA 2.0 लिटरचे चार सिलेंडर असलेले हायब्रीड पेट्रोल युनिट देण्यात येणार आहे. जी ई-CVT ट्रांसमिशनशी जोडली जाईल.

Invicto चे उत्पादन हे टोयोटाच्या बिदादी प्लांटमध्ये हायक्रॉससह केले जाणार आहे. त्याप्रमाणेच जसे कंपनी टोयोटा ग्रँड विटारा आणि हायरायडरचे एकत्रित उत्पादन करते. मारूती सुझुकीला TNGA-C प्लॅटफॉर्म आणि स्ट्राँग-हायब्रीड पॉवरट्रेन वापरण्यासाठी टोयोटाला रॉयल्टी द्यावी लागणार आहे. इन्व्हिक्टोची किंमत हायक्रॉसपेक्षा अधिक प्रीमियम असेल.

हेही वाचा : भारतीय सैन्याची ताकद वाढणार! महिंद्राने सुरू केली ‘या’ खास वाहनाची डिलिव्हरी; बॉम्ब, ग्रेनेडपासून होणार संरक्षण

किंमत आणि कोणाशी करणार स्पर्धा

५ जुलै रोजी भारतामध्ये Invicto लॉन्च होणार आहे. याची किंमत अंदाजे १८ ते ३० लाख (एक्स-शोरूम) रुपये असण्याची शक्यता आहे. यासाठी १९ जून म्हणजेच आजपासून बुकिंगला सुरूवात झाली आहे. Invicto लॉन्च झाल्यावर हे मॉडेल Innova Hycross, Kia Carnival ला टक्कर देईल.