टाटा मोटर्स कंपनीची बाजारात जोरदार घोडदौड सुरू आहे. कंपनीच्या दोन छोट्या एसयूव्हींना ग्राहकांची पसंती मिळत आहे. टाटाच्या सर्वात छोट्या आणि स्वस्त एसयूव्हीने नुकताच एक मैलाचा दगड पार केला आहे. टाटा मोटर्स कंपनीने आतापर्यंत या एसयूव्हीच्या दोन लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीच्या पुणे प्लान्टमध्ये या सर्व कार तयार होऊन आता भारतातल्या वेगवेगळ्या रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. टाटा मोटर्सच्या या जबरदस्त कारला हा विक्रमी टप्पा ओलांडण्यासाठी १९ महिने लागले.
टाटा मोटर्सने ही एसयूव्ही ऑक्टोबर २०२१ मध्ये लाँच केली होती. लाँचिंगनंतर अवघ्या १० महिन्यात या कारने एक लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर आता नऊ महिन्यात कंपनीने आणखी एक लाख गाडया विकल्या आहेत. या कारची सुरुवातीची किंमत अवघी ६ लाख रुपये इतकी आहे. या कारच्या टॉप मॉडेलची किंमत ९.५० लाख रुपये इतकी असून कारला सुरक्षेच्या बाबतीत ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे.
या शानदार कारच्या विक्रीत २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये ४७५ टक्के वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० वाहनांमध्ये या कारचा नंबर १० वा आहे. मारुती वॅगनआर ही देशातली सर्वाधिक विकली गेलेली कार असली तरी या कारची विक्री केवळ १८ टक्क्यांनी वाढली आहे. देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या यादीत मारुती बलेनो, स्विफ्ट, टाटा नेक्सॉन, मारुती अल्टो, डिझायर, ह्युंदाई क्रेटा, मारुती अर्टिगा, ब्रेझा या वाहनांचा समावेश आहे. तर १० वा नंबर टाटाची छोटी एसयूव्ही पंचने पटकावला आहे.
हे ही वाचा >> दोन कोटींच्या Porsche कारची काही क्षणात झाली राख; झाडावर आदळली अन्…!
इंजिन आणि मायलेज
टाटा पंच या कारमध्ये १.२ लीटर रिव्होट्रॉन इंजिन देण्यात आलं आहे, जे ८६ पीएस पॉवर आणि ११३ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. यामध्ये ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच कारच्या टॉप मॉडेल्समध्ये ५ स्पीड एएमटीचा पर्याय देखील मिळतो. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनवर १८.९७ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट १८.८२ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देण्यास सक्षम आहे.