अर्पणा देशपांडे

रोहन तणतणतच घरात आला. चप्पल हवेत उडवून, हातातील बॅट दणकन् आपटून रागारागात पाय आपटत तो आत गेला आणि त्याने आईचा मोबाइल हातात घेतला. आजोबा शांतपणे हे सगळं बघत होते.
आई ओरडली, ‘‘रोहन, आधी हातपाय स्वच्छ धू. तोंडावर पाणी मार. कपडे बदल. तो मोबाइल बाजूला ठेव आधी.’’
‘‘मी नाही येणार जा..’’ मोबाइल गेम खेळत तो आतूनच ओरडला.
मग तर आई अजूनच चिडली. हे बघून आजी बाहेर आली.
‘‘रोहन, आज खायला काय बनवलंय माहित्येय..? तुझ्या आवडीचं!’’ रोहनचे डोळे चमकले.
‘‘काय बनवलंय आज्जी?’’
‘‘पास्ता आणि मोसंबी ज्यूस. पण अशा घाणेरडय़ा हाताने पिणार का ज्यूस? जा आधी स्वच्छ होऊन ये बरं.’’
रोहन पळत गेला आणि स्वच्छ होऊन कपडे बदलून बसला. तो अजूनही घुश्शातच होता. पास्त्याची बशी त्याच्या हातात देत आई म्हणाली,
‘‘कशाचा राग आलाय तुला? मला तरी सांग!’’
‘‘तो विहान आहे नं, तो मला बॅटिंग देतच नाही. सारखं फिल्डिंग कर म्हणतो. मला त्याचा इतका राग येतो की.. ’’
‘‘असं नाही बोलायचं रोहन! पण मी बघितलं तेव्हा तर तूच बॅटिंग करत होतास.. आणि विहान फिल्डिंग! मग आळीपाळीनेच बॅटिंग करायला मिळते नं?’’
‘‘पण बॅट तर माझी आहे.. मलाच मिळायला हवी बॅटिंग!’’ आई आजोबांकडे बघून हसली.
‘‘हसू नको आई! मला खूप राग येतोय.’’
‘‘अरे, माहितेय का.. तुझ्या बाबालापण लहानपणी असाच राग यायचा.’’ आजोबा म्हणाले.
‘‘हो आजोबा..? पण बाबा तर रागावत नाही जास्त.’’- इति रोहन.
‘‘कारण बाबाने त्याचा सगळा राग शहाण्या गुढीला देऊन टाकला होता. तुला आता शहाण्या गुढीची गोष्ट सांगतो..’’
गोष्ट ऐकायला आजी आणि आईपण तिथे येऊन बसल्या.
‘‘शहाणी गुढी? म्हणजे काय आजोबा?’’
‘‘सांगतो. तुला नेहमी खूप राग येतो नं?’’
‘‘हो नं, मला खूप राग येतो त्या मुलांचा. मला बॉलिंग, फिल्डिंग करायला नाही आवडत!’’
‘‘मला सांग- परवा आपल्याकडे काय आहे?’’
‘‘गुढी पाडवा!!’’ रोहन म्हणाला.
‘‘आपण उंचावर किती सुंदर गुढी उभारतो नं? तुझा बाबा लहान होता नं, तेव्हा त्यालाही खूप राग यायचा तुझ्यासारखा. एक दिवस त्याने माझ्याकडे मोठी सायकल मागितली. पण त्याच्याकडे तर सायकल होती. आणि त्याच्या उंचीनुसार ती बरोबर होती.’’ आजोबा सांगत होते.
‘‘पण तुझ्या आजोबांनी नाही म्हटल्यावर बाबाला इतका राग आला की त्याने त्याच्या सायकलच्या दोन्ही चाकांतील हवा काढून टाकली.’’ आज्जी हसत म्हणाली.
‘‘मग?’’ मोसंबी रस पीत रोहनने विचारलं.
‘‘मग काय? आम्ही लक्षच दिलं नाही. नवीन सायकलची गरज नाही.. हीच सायकल छान आहे, हे त्याच्या लक्षात आलं होतं. मग गुपचूप आजीकडून पैसे घेऊन पुन्हा चाकांत हवा भरून आणली त्याने. पण धुसफुस सुरूच होती..’’ आजी म्हणाली.
‘‘पण गुढीचं काय?’’ रोहनला उत्सुकता वाटत होती.
‘‘मग मी काय केलं, वहीचा कागद घेतला. त्यावर बाबाकडून लिहून घेतलं : ‘मी उगाच राग राग करणार नाही. रोज व्यायाम करेन. सगळ्या भाज्या आनंदाने खाईन. आपल्या वस्तू जागेवर ठेवेन.’ आणि तो कागद गुढीला बांधला.’’
‘‘त्याने काय झालं आजोबा?’’
‘‘अरे, ही गुढी म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय! हो किनई..? मग आपण आपल्या सगळ्या वाईट सवयी टाकून द्यायच्या आणि चांगल्या सवयीची गुढी ही अशी छान उंचावर बांधायची. ती आपल्याला वर्षभर शहाण्यासारखं वागायची आठवण करून देते.’’
‘‘मग तुझा बाबा चिडला की आम्ही त्याला म्हणायचो, तू तर शहाण्या गुढीला प्रॉमिस केलंय नं- चिडणार नाही म्हणून? मग तो लगेच शांत व्हायचा.’’
‘‘म्हणून ही शहाणी गुढी!!!’’ रोहन खूश होत म्हणाला.
‘‘म्हणून तुझा बाबा आता किती ‘कुल’ असतो.. हो किनई?’’
‘‘हो आज्जी. मलापण पाहिजे अशी शहाणी गुढी!’’
‘‘मग काय काय लिहू या कागदावर?’’ आजोबांनी विचारलं.
‘‘अंऽऽऽ, लिहायचं- ‘खेळताना भांडायचं नाही. मैदानात खेळायचं.. मोबाइलवर नाही. हिरव्या भाज्या खायच्या. आणि.. आणि काय गं आई?’’
‘‘आणि शहाण्या गुढीची रोज आठवण ठेवायची. लगेच दुसऱ्या दिवशी राग राग नाही करायचा.’’
‘‘होऽऽऽ! मी आता जातो, विहानला बॅटिंग देतो आणि मी फिल्डिंग करतो..’’ असं म्हणून रोहन आनंदाने खेळायला निघाला.
‘‘शाब्बास रोहन!’’ आई कौतुकाने म्हणाली.
adaparnadeshpande@gmail.com