प्राची मोकाशी
रेल्वे यार्डात ‘गप्पू’ नावाचं एक इंजिन बरेच दिवस एकटं उभं होतं. त्याला भरपूर गप्पा मारायला आवडायच्या म्हणून त्याचं नाव ‘गप्पू.’ पण हल्ली गप्पू फारच गप्प गप्प असायचा. त्याचा उदासवाणा चेहरा पाहून शेजारच्या रुळांवर उभ्या असलेल्या गप्पूच्या मित्रानं- म्हणजे कुकू इंजिननं त्याला न राहवून एक दिवस विचारलंच, ‘‘गप्पू, असा उदास का असतोस?’’
‘‘कुकू, जाम बोअर झालंय. तुला माहिती आहे नं, मी आधी कित्ती प्रवास करायचो!’’
‘‘हो! सर्वात जुनं, धावणारं ‘स्टीम इंजिन’ म्हणून तुला ओळखतात!’’
‘‘मस्तपैकी शिट्टी वाजवत मी जंगलांमधून, डोंगरदऱ्यांतून सफर केलीय. नद्यांवरच्या मोठाल्या ब्रिजवरून जाताना मी सळसळणाऱ्या पाण्याचा आनंद घेतलाय! शेतांतून जाताना वाऱ्यावर डोलणारी पिकं पाहिली आहेत. मला बघून लहान लहान मुलं टाळ्या वाजवायची, उडय़ा मारायची.’’
‘‘मग झालं तरी काय?’’
‘‘किती दिवस मी या रेल्वे यार्डात नुसताच पडून आहे. तुम्ही सगळे प्रवासाहून आलात की कित्तीतरी गंमती, गोष्टी सांगता. पण माझ्याकडे सांगायला काहीच नसतं. जाम कंटाळा येतो! माझा आता काहीच उपयोग नाहीये का?’’
‘‘हात्तीच्या.. एवढंच ना! तूच तर सांगत होतास, की तुला दुरुस्तीसाठी इथे आणलंय म्हणून. दुरुस्तीचं काम झाल्यावर धावशील की पुन्हा! काळजी कशाला करतोस?’’
‘‘कुकू, मी खोटं बोलत होतो. मला आता कदाचित कधीच पळवणार नाहीत.’’
‘‘कशावरून?’’
‘‘सगळे म्हणतात, मी म्हातारा झालोय. मला रिटायर्ड करणारेत.’’
‘‘पण तुझ्यावर दुरुस्तीकाम, साफसफाई सुरू असते. तुझी काहीतरी गल्लत झाली असेल..’’
गप्पूला दिलासा देऊन कुकू इंजिन ‘कूऽऽऽकूऽऽऽ’ करत तिथून निघून गेलं.
बरेच दिवस चालणाऱ्या ठाकठुकीने गप्पू निराश झाला होता. पण त्याच्यावर रंगकाम सुरू झाल्यानंतर तो गडबडला. त्याला काहीच समजेना.
एक दिवस सकाळी कुकू इंजिनच्या ‘कूऽऽऽकूऽऽ’ने गप्पूला जाग आली.
‘‘कुकू, कुठे होतास इतके दिवस?’’
‘‘मालगाडीचं इंजिन मी! नेतील तिथं जातो. ते सोड.. तू बघ कसला भारी दिसतोयस!’’
‘‘मस्करी करतोस?’’
‘‘नाही. तुला इंद्रधनुष्यी रंगांच्या पट्टय़ांनी काय सुरेख रंगवलंय! आणि जांभळ्या पट्टय़ावर सिल्व्हर रंगाने रेखीवपणे लिहिलंय- ‘रेनबो एक्स्प्रेस’! म्हणजे मला मिळालेली माहिती खरी होती तर!’’
‘‘कसली?’’
‘‘पठ्ठय़ा, तुला ‘नॅशनल हेरिटेज इंजिन’ घोषित केलंय. इथून दोन तासांवर नवीन झालेल्या ‘नॅशनल पार्क’च्या रूटवर तुला पळवणार आहेत. तुझ्या बोगीही स्पेशल असतील!’’
‘‘तुला कसं समजलं?’’
‘‘मला लावलेल्या दोन डब्ब्यांना आपापसात बोलताना मी ऐकलं..’’
गप्पूचा विश्वासच बसेना. एवढय़ात गप्पूला पाठीमागून जोरात धक्का बसला. तो धक्का त्याच्या ओळखीचा होता.
‘‘लागल्या बघ तुझ्या सातही बोगी! त्यांनाही इंद्रधनुष्याच्या निरनिराळ्या रंगांनी रंगवलंय.’’ कुकू म्हणाला.
म्हणता म्हणता तिथे मुला-मुलींची किलबिल सुरू झाली. शाळेची सहल निघाली होती नॅशनल पार्कला! ‘अफलातून’, ‘भन्नाट’, ‘कित्ती छान..’ असे मुलांचे उद्गार गप्पूला ऐकू येऊ लागले. काही मुलांनी गप्पूसोबत सेल्फीही काढले. त्याला पाहून झालेला आनंद गप्पूला मुलांच्या डोळ्यांमध्ये दिसला आणि गप्पूलाही आनंद झाला.. कित्तीतरी दिवसांनी!
‘‘आपणही उपयोगी आहोत, हा विचारच किती छान आहे.’’ कुकूला ‘बाय’ करत गप्पू म्हणाला.
गप्पूने मग एक मोठ्ठी शिट्टी दिली. ‘रेनबो एक्स्प्रेस’ ट्रेन सज्ज झाली.. तिच्या पहिल्या सफरीसाठी!
mokashiprachi@gmail.com