लोभी शेतकरी

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. तुर्कस्तानातील छोटय़ाशा गावात एक शेतकरी व त्याचे कुटुंब रहात असे.

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. तुर्कस्तानातील छोटय़ाशा गावात एक शेतकरी व त्याचे कुटुंब रहात असे. शेतीवाडी, पेरणी, कापणी अशी नेहमीची शेतीची कामे तो करी. तो आपल्या शेतात निरनिराळी धान्ये, भाजीपाला पिकवत असे. आणि त्या शेतीच्या उत्पन्नावर तो आपली व कुटुंबाची उपजीविका चालवीत असे.

एकदा असेच पेरणीचे दिवस जवळ आले असता त्याने शेतात गहू पेरायचे ठरवले. ज्या दिवशी पेरणी करायची ठरली त्या दिवशी अतिशय जोराचा राक्षसी पाऊस कोसळला. इतका जोरात- जणू ढगफुटी झाली की काय असे वाटण्यासारखा पाऊस प्रचंड विजांच्या कडकडाटांसह कोसळला. तेव्हा शेतकऱ्याने देवाकडे प्रार्थना केली, ‘‘हे देवा, आता पावसाऐवजी जरा ऊन पडले तर मी गव्हाची पेरणी तरी करू शकेन.’’ आणि काय आश्चर्य. खरोखरच पाऊस थांबून छान सोनेरी ऊन पडले. शेतकऱ्याने गव्हाची पेरणी केली. पेरणी झाल्यावर मात्र त्याने दोन दिवसांत देवाकडे प्रार्थना केली. ‘‘देवा, आता मात्र पाऊस पाडलास तर बरे होईल. गव्हाचे चांगले पीक येईल.’’

शेतकऱ्याने अशी प्रार्थना करताच खरोखरच पाऊस सुरू झाला. नंतर काही दिवस ठरावीक अंतराने नियमित पडत राहिला. पुढे सुगीचे दिवस आले. पीक चांगलेच तरारून वर आले. शेत हिरवेगार झाले. गव्हाची कणसे भरगच्च भरली. योग्य वेळ येताच शेतकऱ्याने पिकाची कापणी केली. त्या वर्षी त्याला भरपूर धान्य मिळाले. त्याची वर्षभराची सोय तर झालीच; मुले, बायको सारेच आनंदित झाले. त्याची वर्षभराची सोय होऊन जास्तीचे धान्य शिल्लक राहिले. ते धान्य शेजारच्या गावात विकून शेतकऱ्याने गाठीला चार पैसे बांधले. वर्ष मोठय़ा सुखासमाधानात गेले.

पुन्हा पुढीच्या वर्षी पेरणीचे दिवस आल्यावर त्याने देवाकडे प्रार्थना केली. त्याप्रमाणे त्याच्या इच्छेनुसार पेरणीच्या वेळी आकाश निरभ्र राहिले. पेरणीनंतर छानसा पाऊस पडला. या वर्षी तर त्याला मागील वर्षांपेक्षाही जास्त उत्पन्न मिळाले. भरपूर गहू पिकला. घरादारासाठी वर्षभराचा गहू शिल्लक ठेवूनही शेजारच्या दोन गावांत गहू विकता आला. आता पहिल्यापेक्षाही जास्त पैसे मिळाले. चार पैसे जास्तच शिल्लक राहिले. साऱ्यांचे दिवस अगदी सुखात आरामात गेले.

पुन्हा पुढील वर्षीही गोष्टी त्या त्या क्रमाने घडत गेल्या. शेतकऱ्याला हवा तसा, पिकाला योग्य असा पाऊस पडत गेला. त्याला मागील वर्षीपेक्षाही जास्त पैसे मिळाले. परंतु आता मात्र शेतकऱ्याला जास्तच पैसे कमवण्याचे वेध लागले होते. काहीही करून त्याला जास्तीत जास्त श्रीमंत व्हायचे होते. त्यामुळे पुढील वर्षी छान पाऊस पडून भरपूर पीक आले तरी शेतकऱ्याने देवाकडे तक्रारीचा सूर लावला. ‘‘काय रे देवा, या वर्षी दरवर्षीपेक्षाही जरा अजून जास्त चांगला पाऊस पाडलास तर मी अजून जास्त गहू पिकवू शकेन, तो विकून जास्त श्रीमंत होऊ शकेन. पाड ना खूप पाऊस.’’

असे शेतकऱ्याने म्हटले मात्र, लगेचच आकाशात एकाएकी खूप काळे काळे ढग जमा झाले. ढगांचा प्रचंड गडगडाट झाला. विजा कडाडू लागल्या आणि खरोखरीच ढगफुटी होऊन अतिशय मुसळधार पाऊस सुरू झाला. बघता बघता पाऊस इतका वाढला की नद्या, नाले पुराने दुथडी भरून वाहू लागले. चहूकडे पाणीच पाणी झाले. इतके पाणी झाले की शेतकऱ्याने आधी जमा केलेला गहूही पाण्यात वाहून गेला. शेतकरी दु:खाने डोक्याला हात लावून म्हणाला, ‘‘मला पोटभर मिळून वर चार पैसे जास्त मिळाले तरी मी सतत जास्तीत जास्त पैशांचा लोभ धरला म्हणून देवानेच मला शिक्षा केली.’’

मुलांनो, आपल्याच काय, पण कोणत्याही धर्मात, संस्कृतीत पूर्वीपासून हेच सांगितले व शिकवले आहे की, जास्त मिळवण्यासाठी कष्ट, प्रयत्न जरूर करा, पण अति लोभ, हव्यास करू नका.

ज्योती देशपांडे

(तुर्कस्तानी लोककथेवर आधारित)

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kids story based on turkastani folktale

Next Story
पुस्तकांशी मैत्री : ऋतुचक्र
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी