अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केलं आहे. भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार विषयक संबंधांवर कायमच चर्चा सुरु असते. आता आरबीआयचे माजी चेअरमन रघुराम राजन यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. भारतावर १० ते २० टक्के टॅरिफ लागू करणंच योग्य असेल असं राजन यांनी म्हटलं आहे. तसंच भारताने व्यापार विषयक चर्चा करताना याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही रघुराम राजन म्हणाले आहेत.

काय म्हणाले रघुराम राजन?

डीकोडरला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन यांना अमेरिका आणि भारताचे व्यापार विषयक संबंध आणि टॅरिफबाबत विचारणा करण्यात आली. किती आयात शुल्क असलं पाहिजे? असं विचारलं असता क्षणाचाही विलंब न करता रघुराम राजन म्हणाले खरंतर शून्य टक्के. पण हे शक्य नाही हे मलाही ठाऊक आहे. पण १० ते २० टक्के टॅरिफ लावलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. भारताने अमेरिकेशी व्यापार धोरणांबाबत चर्चा करताना आयातशुल्क १० ते २० टक्के देण्याबाबतच भर दिला पाहिजे किंवा आग्रही राहिलं पाहिजे.

असे करार करु नका जे ओझं होतील-राजन

रघुराम राजन पुढे म्हणाले, पूर्व आशिया आणि दक्षिण आशियातल्या देशांनी अमेरिकेशी जो व्यापार करार केला आहे त्यात त्यांनी १९ टक्के टॅरिफ मान्य केला आहे. तसंच जपानवर १५ टक्के आयातशुल्क आहे. हा विचार केला तर भारतानेही जास्तीत जास्त २० टक्के टॅरिफ देऊ हेच लक्ष्य व्यापारविषयक चर्चा करताना ठेवलं पाहिजे. अशा प्रकारचा कुठलाही करार भारताने करायला नको ज्यामुळे अर्थव्यवस्थेवरचा बोजा वाढेल असंही रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

आर्थिक जोखमीचा विचार भारताने केला पाहिजे-रघुराम राजन

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन पुढे म्हणाले, जपान आणि युरोप यांचं उदाहरण भारताने डोळ्यांसमोर ठेवलं पाहिजे. व्यापार विषयक करार करताना भारताने असं कुठलंही आश्वासन द्यायला नको जे पूर्ण करणं कठीण होईल, असं झाल्यास आपल्या देशापुढील अडचणी वाढू शकतात. जपान आणि युरोपमधील काही देशांनी अशी काही आश्वासनं दिली आहेत. मात्र त्याचा फायदा अमेरिकेला जास्त होणार आहे. अशा प्रकाराची आश्वासनं देताना भारताने विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. अमेरिकेशी चर्चा करताना आर्थिक जोखीम हा मुद्दा विचारात घेऊनच चर्चा केली पाहिजे असंही रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.