टाटा समूहातील दोन कंपन्यांनी नियोजित विस्तारासाठी मोठ्या भांडवली खर्चाच्या योजना जाहीर केल्या आहेत. यात टाटा स्टील या पोलाद निर्मिती क्षेत्रातील जागतिक कंपनीने १६,००० कोटी रुपयांची, तर ऊर्जा क्षेत्रातील टाटा पॉवर या कंपनीने १२,००० कोटींची योजना जाहीर केली आहे. सोमवारी १०४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना टाटा पॉवरचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीही निर्धारित वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंपनीकडून १२,००० कोटी रुपये भांडवली खर्चाच्या योजना आखली गेली असल्याचे सांगितले.

यामध्ये आगामी चार गिगावॅट क्षमतेचे उत्पादन प्रकल्प, बांधकामाधीन अक्षय्य ऊर्जा प्रकल्प, ओडिशा, दिल्ली आणि मुंबईमधील वीज वितरण आणि पारेषण व्यवसाय आणि नवीन संधींमधील गुंतवणूक समाविष्ट असल्याचे त्यांनी भागधारकांना उद्देशून सांगितले. टाटा स्टीलच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे दोन्ही पातळ्यांवरील भांडवली प्रकल्पांवर १६,००० कोटी रुपये खर्च केले जातील. चालू आर्थिक वर्षात टाटा पॉवरही भांडवली खर्च दुप्पट करून तो १२,००० कोटी रुपयांवर नेणार आहे, ज्यायोगे अक्षय्य ऊर्जा निर्मिती, वितरण, पारेषण आणि सौर उपकरणे उत्पादन क्षमता वाढवण्यावर लक्ष दिले जाणार आहे.

हेही वाचाः अनिल अंबानींवर आणखी एक संकट; आता ‘ही’ कंपनी बंद होण्याची शक्यता

टाटा स्टीलचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांच्या मते, नियोजित रकमेपैकी, टाटा स्टीलच्या कामकाजासाठी १०,००० कोटी रुपये आणि तर भारतीय उपकंपन्यांसाठी २,००० कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. विशेषतः टाटा स्टीलच्या कलिंगानगर प्रकल्पावर यापैकी अंदाजे ७० टक्के रक्कम खर्च केली जाईल, असे संकेत आहेत.

हेही वाचाः ५ अन् १० नव्हे तर जुलैमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण यादी