वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ॲपल, मायक्रोसॉफ्ट या दोन्ही जगातिक महाकाय तंत्रज्ञान कंपन्यांनी प्रत्येकी ४ लाख कोटी डॉलरचा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला. अमेरिकी शेअर बाजारात मंगळवारच्या सत्रात दोन्ही कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाल्याने त्यांच्या बाजार भांडवलाने ही अनोखी उंची गाठली.
दोन्ही कंपन्यांनी मोठ्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला असला तरी अजूनही एनव्हीडियापेक्षा त्यांचे बाजार भांडवल कमी आहे. जगातील सर्वात मौल्यवान कंपनी एनव्हीडियाचे बाजार भांडवल ४.६ लाख कोटी (ट्रिलियन) डॉलरपेक्षा अधिक आहे. मायक्रोसॉफ्टने यापूर्वी जुलैमध्ये ४ ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला होता. कंपनीने ओपनएआयच्या व्यवसायात २७ टक्के हिस्सा मिळवला आहे. परिणामी मायक्रोसॉफ्टचा समभाग सुमारे ३ टक्क्यांनी वधारला आहे. सप्टेंबरमध्ये बाजारात उपलब्ध झालेल्या आयफोन १७ या स्मार्टफोनला खरेदीदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, त्या परिणामी ॲपलचे समभाग वधारले आहेत. गेल्या ३ महिन्यांत समभागाचे मूल्य २५ टक्क्यांनी वधारले आहे. तर मागील तीन महिन्यांत मायक्रोसॉफ्टचा समभाग ६ टक्क्यांनी वधारला आहे.
