नवी दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीमुळे उफाळलेल्या जगातील सर्वात लोकप्रिय आभासी चलन असणाऱ्या ‘बिटकॉइन’ने गुरुवारच्या सत्रात १ लाख डॉलरची सार्वकालिक शिखर पातळी गाठली. जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य १,०२,८६८ अमेरिकी डॉलर अर्थात भारतीय रुपयात ते सुमारे ८७,१४,७८१ हजार रुपये झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे, २०१० मध्ये एका बिटकॉइनचे मूल्य भारतीय रुपयात फक्त ८ रुपये (०.०१ अमेरिकी डॉलर) इतके होते. गेल्या काही दिवसांत या आभासी चलनाच्या मूल्यात वेगाने वाढ झाली आहे. मुख्यतः अमेरिकेतील ताज्या घडामोडींमुळे बिटकॉइनला पुन्हा वेगवान तेजीची दौड सुरू केली आहे.

हेही वाचा >>> ह्युंदाई मोटारींच्या किमतीत वाढ

आभासी चलनाचे पुरस्कर्ते समजले जाणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी पुन्हा निवडून येण्याने बिटकॉइनमधील तेजीला चालना दिली आहे. शिवाय तेथील बाजार नियंत्रक असलेल्या ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन’चे (एसईसी) पुढील अध्यक्ष म्हणून पॉल ॲटकिन्स यांची निवड होण्याची शक्यता आहे. हे दोघेही क्रिप्टो चलनासाठी सकारात्मक दृष्टिकोन राखतील अशी आशा आहे. ॲटकिन्स यांच्या निवडीच्या संकेतानंतर काही तासांतच बिटकॉइनने १ लाख डॉलरचा टप्पा गाठला. जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ॲटकिन्स हे एसईसीचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनाच पुन्हा हे पद देण्याचा मानस असल्याचे ट्रम्प यांनी बुधवारी सूचित केले आहे.

हेही वाचा >>> रिझर्व्ह बँकेकडून ऑक्टोबरमध्ये २७ टन सोने खरेदी

ट्रम्प यांच्या निवडीचा अधिकृत निकाल येण्यापूर्वीच बिटकॉइनमध्ये तेजी सुरू झाली. विशेषतः ५ नोव्हेंबरच्या रोजी पार पडलेल्या निवडणुकीत ट्रम्प विजयी झाल्यापासून बिटकॉइनने अभूतपूर्व उंची गाठली आहे. याआधी ‘एफटीएक्स’ हा क्रिप्टो एक्सचेंज अर्थात आभासी बाजारमंच कोसळल्यानंतर बिटकाइनने १७,००० डॉलरचा तळ गाठला होता.

तथापि, बाजारतज्ज्ञांनी सावधगिरीचा इशाराही दिला आहे. मागणी आणि पुरवठा तत्त्वावर मूल्य ठरणाऱ्या या चलनातील ही तीव्र वाढ हा एकप्रकारे फुगा असून, तो अधिक ताणला जाऊन जोरात फुटूही शकतो, अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे. जगातील काही देशांमध्ये बिटकॉइनला कायदेशीर मान्यता असली तरी भारतात बिटकॉइनला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही. तरी त्यात व्यवहार होतात आणि मोठ्या कर-भाराची त्या व्यवहारांवर जरब आहे. अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेनेदेखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bitcoin surges above 100000 usd for the first time in 2024 print eco news zws