पीटीआय, नवी दिल्ली
सरलेल्या एप्रिल महिन्यात भाज्यांच्या किमती नरमल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून, त्यांचा आहारावरील होणार खर्च कमी झाला आहे.
क्रिसिलच्या ‘रोटी राईस रेट’ अहवालानुसार, एप्रिलमध्ये शाकाहारी थाळीची किंमत वार्षिक आधारावर ४ टक्क्यांनी तर मासिक आधारावर १ टक्क्यांनी कमी होऊन २६.३ रुपये झाली होती. सरलेल्या एप्रिल महिन्यात कांदा, बटाटा व टोमॅटोच्या किमती कमी झाल्यामुळे शाकाहारी थाळीची सरासरी किंमत ४ टक्क्यांनी झाली आहे. टोमॅटोच्या किमतीमध्ये ३४ टक्के घट, बटाट्यामध्ये ११ टक्के घट आणि कांद्याच्या किमतीमध्ये ६ टक्के घसरण झाली आहे. मात्र याच काळात आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे वनस्पती तेलाच्या किमतीत १९ टक्के तर एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६ टक्के वाढ झाल्याने थाळीच्या किमतीतील घट मर्यादित राहिली.
मांसाहारी थाळीची किंमत देखील कमी झाली आहे. वार्षिक आधारावर ती ४ टक्के आणि मासिक आधारावर २ टक्क्यांनी घटून ५३.९ रुपये प्रति थाळी झाली, असे क्रिसिलच्या अहवालाने नमूद केले. ब्रॉयलर चिकनच्या किमतीत घटीने मांसाहारी जेवणाची सरासरी किंमत घटली, असे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या क्रिसिल मार्केट इंटेलिजेंसच्या अहवालात म्हटले आहे. मात्र काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे मागणीवर परिणाम दिसून आला होता.
मजबूत देशांतर्गत उत्पादनासह येत्या काही महिन्यात गहू आणि डाळींच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. पुढील २-३ महिन्यांत प्रामुख्याने अर्जेंटिना, इंडोनेशिया आणि मलेशियामधून जागतिक अन्नधान्य पुरवठा वाढल्याने, खाद्यतेलाच्या किमतीही कमी होण्याची शक्यता आहे, असे क्रिसिल इंटेलिजेंसचे संचालक पुषण शर्मा यांनी सांगितले.