सक्तवसुली संचलनालयानं ( ईडी ) जेट एअरवेजवर मोठी कारवाई केली आहे. ईडीनं जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित ५०० हून अधिक कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं १ डिसेंबरला नरेश गोयला यांना अटक केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईडीनं ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, पीएमएलए २००२ च्या तरतुदींनुसार ५३८.०५ कोटी रूपयांची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये जेट एअर प्रायव्हेट लिमिटेड, जेट एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड, जेट एअरवेज ( इंडिया ) लिमिटेड ( जेआयएल ) चे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल, त्यांची पत्नी अनित गोयल आणि मुलगा निवान गोयल अशा विविध कंपन्या आणि व्यक्तींच्या नावे १७ निवासी फ्लॅट/बंगले आणि व्यावसायिक जागांचा समावेश आहे. ही मालमत्ता लंडन, दुबई आणि भारतातील विविध राज्यांमध्ये आहे.

हेही वाचा : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीने अटक का केली? काय आहे कॅनरा बँक घोटाळा प्रकरण?

दरम्यान, कॅनरा बँकेचे ५३८ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीने १ सप्टेंबरला नरेश गोयल यांना अटक केली होती. मंगळवारी ( ३१ ऑक्टोबर ) ईडीनं नरेश गोयल यांच्यासह पाच जणांविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

याप्रकरणी कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज सुविधा पुरवली होती. तक्रारीनुसार हा गुन्हा १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ या काळात घडला. जेट एअरवेजचे खाते बँकेने ५ जून २०१९ मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढ्या रकमेचे बँकेचे नुकसान झाले. त्यामुळे बँकेद्वारे करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांच्या तपासणीत बँकेकडून देण्यात आलेला निधी इतर ठिकाणी वळवण्यात आल्याचे उघड झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याप्रकरणात अज्ञात सरकारी अधिकाऱ्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्ली सीबीआयने भादंवि कलम ४०९, ४२०, १२० (ब) सह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३ (२), १३ (१) (क) व १३ (१) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करत असून नरेश गोयल, त्याची पत्नी अनिता व चार कंपन्यांविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : जेट एअरवेजसह नरेश गोयलही गोत्यात अशी वेळ का आली?

ईडीच्या तपासानुसार १० बँकांच्या समुहाचे सुमारे ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवण्यात आले आहे. न्यायवैधक लेखापाल परीक्षणात सल्लागार आणि व्यावसायिक शुल्काच्या नावाखाली सुमारे एक हजार १५२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. तसेच सुमारे दोन हजार ५४७ कोटी ८३ लाख रुपये जेट लाईट लिमिटेड या कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. गेल्या काही वर्षांत नऊ कोटी ४६ लाख रुपये नरेश गोयल यांच्या कुटुंबियांना देण्यात आले. त्यात गोयल यांची पत्नी अनिता गोयल, मुलगी नम्रता गोयल व मुलगा निवान गोयल यांच्या समावेश आहे. २०११-१२ ते २०१८-१९ या काळात विविध कारणे देऊन ही रक्कम कंपनीतून पाठवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed jet airways properties worth 538 crore seized in money laundering case ssa