पीटीआय, नवी दिल्ली

शिखराला भिडल्यानंतर आता सोन्याच्या किमतीतील स्थिरता आणि जागतिक अनिश्चिततेमुळे मे महिन्यात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड अर्थात गोल्ड ईटीएफमध्ये २९२ कोटी रुपयांचा नक्त ओघ राहिला. यातून या श्रेणीतील व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) मेअखेर ६२,४५३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (ॲम्फी) ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिलमधील ६ कोटी आणि मार्चमध्ये झालेल्या ७७ कोटी रुपयांच्या तुलनेत, गेल्या महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये २९२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. या फंड प्रकारामधील फोलिओंची संख्या एप्रिलमध्ये ७१.४५ लाखांवरून, मे महिन्यात २.२४ लाखांनी वाढून ७३.६९ लाख झाली. हे आकडे गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांच्या वाढत्या पसंतीला दर्शवितात.

जागतिक पातळीवरील अस्थिर वातावरण आणि सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून गुंतवणूकदार पुन्हा एकदा गोल्ड ईटीएफकडे वळले आहेत. शिवाय, मे महिन्यातील सोन्याच्या किमतीतील स्थिरतेमुळे गोल्ड ईटीएफचे आकर्षण वाढले आहे. आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओला पुनर्संतुलित करण्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा आकर्षक पर्याय आहे, असे मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे वरिष्ठ विश्लेषक – व्यवस्थापक संशोधन नेहल मेश्राम म्हणाले.

‘सिल्व्हर ईटीएफ’लाही चकाकी

चांदीच्या किमतीतील तेजीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात ‘सिल्व्हर ईटीएफ’ला गोल्ड ईटीएफपेक्षा सरस मागणी राहिल्याचे आकडे दर्शवितात. जून २०२४ पासून वर्षभरात, सिल्व्हर ईटीएफच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) मे २०२५ अखेरपर्यंत १२५.६८ टक्क्यांनी वाढली आहे. अर्थात ७,४७३.३४ कोटी रुपयांवरून ती आता १६,८६६.२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याच कालावधीत, गोल्ड ईटीएफमधील एयूएम ८१.७८ टक्क्यांनी वाढून, आता ६२,४५२.९४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सिल्व्हर ईटीएफ फोलिओंची संख्या सरलेल्या मेअखेर ८.३७ लाखांहून अधिक झाली आहे.

गोल्ड ईटीएफ म्हणजे काय?

गोल्ड ईटीएफ हे म्युच्युअल फंडांच्या युनिट्सप्रमाणे शुद्ध सोन्यातील गुंतवणुकीचे युनिट्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जतन करतात आणि डिमॅट खात्यात साठवले जाते. भौतिक धातूंमध्ये गुंतवणूक करण्याइतकाच हा सरळ, सुरक्षित व सोपा पर्याय आहे. गोल्ड ईटीएफचे प्रत्येक युनिट अत्यंत उच्च शुद्धतेच्या सोन्याच्या मूल्याइतकेच असते. इतर कोणत्याही ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड-ईटीएफ’प्रमाणे गोल्ड ईटीएफदेखील भांडवली बाजारात सूचिबद्ध आणि निरंतर खरेदी-विक्री व्यापारास खुले असते. गोल्ड ईटीएफमध्ये कमीत कमी ४५ रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. सोन्यात गुंतवणुकीसाठी गोल्ड ईटीएफ एक सुरक्षित पर्याय समजला जातो. गोल्ड ईटीएफ हा म्युच्युअल फंडच असतो.