India-Pakistan Asia Cup Match ad rates fall 20 per cent : भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील आशिया चषक स्पर्धेतील सामना आज दुबईत होणार आहे. या सामन्याची मैदानाबाहेर चांगलीच चर्चा होत आहे. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर तसेच बीसीसीआयवर या सामन्यावरून टीका केली जात आहे. तसेच या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील केली जात आहे. याचा परिणाम या सामन्याला मिळणाऱ्या प्रतिसादावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. जाहिरातदारांसाठी नेहमीच आकर्षण असलेला भारत-पाक सामन्याला यंदा मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. क्रिकेटमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या या सामन्यासाठीच्या जाहिरातींच्या दरात १५ ते २० टक्के घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या रिपोर्टनुसार, यापूर्वीच्या भारत- पाकिस्तान आशिया कप सामन्यांदरम्यान लिनिअर टेलिव्हिजनवर १० सेकंदांच्या जाहिरातीसाठी सरासरी दर १० लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत होता. आयसीसी स्पर्धांसाठी हा आकडा २० लाख रुपयांपर्यंत जातो. मात्र दुबईमध्ये आज होत असलेल्या समान्याला याची बरोबरी करता आलेली नाही. राजकीय पक्षांकडून बहिष्काराचे आवाहन आणि बाजारातील अडथळे यामुळे हे झाल्याचे जाहिरातदारांचे म्हणणे आहे.
गेमिंगवरील बंदीचा फटका
इंडस्ट्री एक्झिक्युटिव्ह्स यांच्या मते, ‘रिअल मनी गेमिंग’ (RMG) क्षेत्रावर अचानकपण बंदी घालण्यात आल्यामुळे क्रिकेट सामन्यादरम्यान दिल्या जाणाऱ्या जाहिरातींना सर्वाधिक फटका बसला आहे. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात येणारा पैसा बंद झाल्याने जाहिरातींच्या मागणीत घट झाली आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या राजकीय तणावामुळे ब्रँड्स जाहिराती देण्यापासून मागे हटताना दिसत आहेत .
भारताच्या सामन्यांव्यतिरिक्त इतर देशांचे सामने जसे की युनायटेड अरब अमिरात, हाँगकाँग, बांग्लादेश आणि ओमान यांच्या सामन्यांना प्रेक्षकांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याचा देखील जाहिरातींवर परिणाम होत आहे.
फ्लॅट-रेट स्टॅटर्जी
एशियन क्रिकेट काउन्सिलचे (ACC) २०३१ पर्यंतचे मीडिया हक्क सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाकडे (SPNI) आहेत आणि त्यांच्याकडून ही परिस्थिती हाताळण्यासाठी फ्लॅट-रेट प्रायसिंग मॉडेल वापरले जात आहे. ज्यामध्ये त्यांनी सात महत्त्वाचे सामने एकत्रित केले आहेत, ज्यामध्ये भारताच्याही समान्यांचा समावेश असू शकतो. ज्यासाठी लिनियर टेलिव्हिजनवर प्रति १० सेकंदांच्या स्लॉटसाठी जाहिरातीचे दर १६ लाख रुपये ठेवण्यात आला आहे, आणि या पॅकेजमध्ये इतर सर्व सामन्यांचाही समावेश असेल.
असे असले तरी कनेक्टेड टीव्ही (CTV)चे दर मात्र चढेच राहिले आहेत. हे दर प्रति १० सेकंद स्लॉटसाठी २० लाख रुपये ते २४ लाख रुपयांच्या दरम्यान आहेत, अशी माहिती एनव्ही कॅपिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर विवेक मेनन यांनी दिली. त्यांनी नमूद केले की सीटीव्ही प्रायसिंग ही स्थिर राहिली आहे. तसेच गेमिंग कंपन्या नसल्याने एकूण जाहिरातींना मोठा फटका बसला आहे.
डिजिटल सेगमेंट अजूनही वरचढ
डिजिटल स्ट्रीमिंगमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचे महत्त्व अद्यापही टिकून आहे.. आशिया चषक सामन्यांसाठी, डिजिटल स्ट्रीमिंगमधील १०-सेकंदांच्या जाहिरातीचा दर सामान्यपणे २७५ रुपये आहे. भारताच्या सामन्यांसाठी हा दर ५०० रुपयांपर्यंत वाढतो आणि भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ७५० रुपयांपर्यंत पोहोचतो. यावरून भारत आणि पाकिस्तान सामन्याला डिजिटल स्ट्रीमिंगदरम्यान अजूनही मोठी मागणी असल्याचे दिसून येते.