मुंबई: सरलेल्या जून महिन्यात भारताच्या सेवा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यापारात लक्षणीय वाढ दिसून आली. निर्यात आणि आयात दोन्हीमध्ये वार्षिक आधारावर वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून शुक्रवारी स्पष्ट झाले.

जून २०२५ मध्ये सेवा निर्यातीचे मूल्य (प्राप्ती) ३२.११ अब्ज अमेरिकी डॉलर नोंदविले गेले. जे मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ दर्शवते. दरम्यान, सेवा आयात १५.९० अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे, जी जून २०२४ च्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढली आहे.

जूनच्या आकडेवारीवरून, देशाच्या सेवा निर्यात उत्पन्नाचा कणा असलेल्या विशेषतः माहिती-तंत्रज्ञान (आयटी), व्यवसाय आणि वित्तीय सेवांमध्ये दमदार वाढ झाली आहे. एप्रिल आणि मे २०२५ या दोन महिन्यांच्या कालावधीत, सेवा निर्यात अनुक्रमे ३२.८४ अब्ज डॉलर आणि ३२.४५ अब्ज डॉलर इतकी नोंदवली गेली होती. ज्यामध्ये वार्षिक तुलनेत अनुक्रमे ८.८ टक्के आणि ९.६ टक्के वाढ नोंदवली होती. आयातीच्या बाबतीत, जूनमध्ये वाढीचा वेग किंचित वाढला. मे २०२५ मध्ये आयात १.१ टक्क्यांनी कमी झाली असली, तरी जूनमध्ये ती ५ टक्क्यांनी वाढली जी परदेशी व्यावसायिक आणि तांत्रिक सेवांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता दर्शवते.