Income Tax Return Filing Deadline Extension: आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयटीआर भरण्याची शेवटची मुदत १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे. ही मुदत संपण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत, यादरम्यान अनेकजण मुदतवाढ मिळण्याची वाट पाहत आहेत. इतकेच नाही तर सोशल मीडियावर मुदतवाढ मिळाल्याचे मेसेज देखील व्हायरल होत आहेत. यातच रविवारी रात्री उशीरा आयकर विभागाने या मुदतवाढीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्तीकर विभागाच्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. यानंतर आरटीआर दाखल करण्यासाठी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी अनेक जण करत आहेत. आयटीआर भरण्यासाठीची यापूर्वी २७ मे रोजी मुदतवाढ देण्यात आली होती, तेव्हा नेहमीच्या ३१ जुलै या अंतिम मुदतीमध्ये वाढ करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा मुदतवाढ दिली नसल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे
आरटीआर भरण्यासाठी नव्याने मुदतवाढ दिली?
काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे प्राप्तीकर विभागाने सांगितले आहे. या पोस्टमध्ये दावा केला जात आहे की आयटीआर भरण्याची अंतिम मुदत सध्याच्या १५ सप्टेंबरवरून ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्राप्तीकर विभागाने अशी कोणतीही मुदतवाढ जाहीर केलेली नाही. आयटीआर भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर हीच आहे. प्राप्तिकर विभागाने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
प्राप्तिकर विभागाने फक्त प्राप्तिकर विभागाचे अधिकृत सोशल मिडिया हँडल @IncomeTaxIndia याच्यावर आलेल्या अपडेट्सवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.
करदात्यांना आयटीआर दाखल करण्यासाठी, टॅक्स पेमेंट आणि इतर संबंधित सेवांमध्ये मदतीसाठी, आमचा हेल्पडेस्क २४x७ कार्यरत आहे. आम्ही कॉल, लाइव्ह चॅट, वेबएक्स सेशन्स आणि ट्विटर/एक्सच्या माध्यमातून मदत पुरवत आहोत, असेही प्राप्तीकर विभागाने सांगितले आहे.
अंतिम मुदत चुकवल्याबद्दल काही दंड आहे का?
जरी तुम्ही वर्षाच्या अखेरीपर्यंत विलंबित ITR दाखल करू शकता, परंतु हे लक्षात ठेवा की उशिरा दाखल केल्यास विलंब कालावधीच्या आधारावर दंड आकारला जातो. जर एकूण उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर ५,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार ११ सप्टेंबर पर्यंत जवळपास ५.४७ कोटी करदात्यांनी आयटीआर भरला होता. मात्र नोंदणीकृत वैयक्तिक करदात्यांची संख्या १३.३७ कोटी इतकी आहे. तीन दिवस शिल्लक असताना हा आकडा ८ कोटींवर जाण्याची कर विभागाने अपेक्षा व्यक्त केली होती. मागच्या वर्षी ३१ जुलै २०२४ पर्यंतच्या अंतिम मुदतीपर्यंत सुमारे ७.२४ कोटी करदात्यांनी आयटीआर फाईल केला होता.