इन्कम टॅक्स रिटर्न भरणा ही प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी महत्त्वाची बाब मानली जाते. याचसाठी प्राप्तीकर अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठीची मुदत सरकारकडून वारंवार वाढवून दिली जाते. यंदा मात्र तीन वेळा मुदत वाढवल्यानंतर आता मुदत वाढवून दिली जाणार नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर २०२५ ही ITR भरण्याची शेवटची मुदत असणार आहे. त्यामुळे सर्व पात्र नोकरदार व्यक्तींना या तारखेपर्यंत त्यांचा ITR भरणं आवश्यक आहे. पण खरंच या तारखेपर्यंतच आपल्याला आयटीआर भरता येणार आहे का?
संधी हुकली, तरी भरणा शक्य आहे!
प्राप्तीकर विभागाकडून जारी करण्यात आलेल्या तारखेनुसार, १६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आयटीआर भरता येणार आहे. पण जर समजा काही अपरिहार्य कारणांमुळे तुमची ही तारीख चुकली आणि आयटीआर भरता आला नाही, तरीदेखील तुम्हाला या तारखेनंतरही आयटीआर भरता येणार आहे. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत असेल. अर्थात, आणखी तीन महिन्यांपर्यंत तुम्हाला आयटीआर भरता येणं शक्य असेल. पण यासाठी तुम्हाला अतिरिक्त विलंब शुल्क अर्थात लेट फी भरावी लागेल.
Belated Return म्हणजे काय?
जे आयटीआर ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये भरले जात नाही, त्याला Belated Return म्हटलं जातं. आयकर विभागाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, विहीत मुदतीमध्ये आयटीआर न भरता आलेल्या व्यक्तींना आधीच्या कोणत्याही वर्षाचा आयटीआर चालू आर्थिक वर्ष संपायच्या तीन महिने आधीपर्यंत किंवा आर्थिक आढावा संपायच्या आधीपर्यंत यापैकी जे काही लवकर असेल, तोपर्यंत भरता येऊ शकतो.
‘मुदतीनंतर’ची अंतिम मुदत किती?
अशा प्रकारे आधी ठरवून दिलेली मुदत उलटून गेल्यानंतर विलंब शुल्कासह भरता येणारा आयटीआरदेखील एका विशिष्ट काळात भरणं आवश्यक आहे. त्यानुसार, चालू आर्थिक वर्षाचा म्हणजेच २०२४-२५ साठीचा आयटीआर विलंब शुल्कासह ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत भरता येणं शक्य आहे. पण जर तुम्ही ही मुदतही चुकवलीत, तर मात्र तुम्हाला अपडेटेड रिटर्न म्हणजेच ITR-U भरावा लागेल. यासाठी आणखी अतिरिक्त शुल्क आणि निर्बंध लागू असतील.
३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ITR भरण्यासाठी शुल्क किती?
तुम्ही विहीत मुदतीनंतर आयटीआर भरल्यास तुम्हाला कलम २३४ फ नुसार विलंब शुल्क भरावे लागते. तुमचं एकूण उत्पन्न ५ लाखांपर्यंत असेल, तर हे शुल्क १ हजार इतके असेल. त्यापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांसाठी हे शुल्क ५ हजार रुपये इतके असू शकेल.
मुदतीनंतर ITR भरण्याचे परिणाम
मुदतीनंतरदेखील आयटीआर भरण्याची सुविधा उपलब्ध असली, तरी त्याचे काही परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.
१. विलंब शुल्क – उशीरा आयटीआर भरण्यासाठी आपल्याला १ हजार किंवा ५ हजार रुपये (एकूण उत्पन्नानुसार) विलंब शुल्क अर्थात लेट फी भरावी लागू शकते.
२. व्याज आकारणी – तुमच्याकडे प्रलंबित आयटीआरच्या रकमेवर कलम २३४ अ, कलम २३४ ब आणि कलम २३४ क नुसार व्याज आकारणी होऊ शकते.
३. परताव्यास विलंब – जितका उशीर तुम्ही आयटीआर भरणा करण्यास कराल, तितका परतावाही उशीरा मिळू शकतो.
४. सखोल तपासणी – आयटीआर भरण्यास वारंवार उशीर होत असल्यास प्राप्तीकर विभागाकडून तुमच्या व्यवहारांची सखोल तपासणी केली जाऊ शकते.