मुंबई: कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या ‘कोटक बिझलॅब्स’च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली असून, ऑक्टोबर २०२५ ते नोव्हेंबर २०२६ पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमांतून संपूर्ण भारतभरातील ७५ हून अधिक नवउद्यमींना (स्टार्टअप्स) सहाय्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

कोटक महिंद्र बँकेच्या सामाजिक दायित्व (सीएसआर) कार्यक्रमाचा भाग असलेला हा उपक्रम म्हणजे देशाच्या उद्यमशील भावनेला प्रभावी चालना आहे. सुरुवातीच्या महसूल टप्प्यातील नवउद्यमींना सखोल व बहुस्तरीय मार्गदर्शन, बाजारपेठेतील प्रवेश आणि उत्प्रेरक निधीसह यातून पाठबळ दिले जाते. पहिल्या पर्वात देशभरातून प्राप्त झालेल्या १,५०० हून अर्जापैकी, सुमारे ५०० नवउद्यमी संस्थापकांनी बाह्य आणि ज्ञान सत्रांद्वारे प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. त्यातून ५५ नवउद्यमींना संरचित मार्गदर्शन आणि वाढीसाठी गती दिली गेली आणि ३२ उपक्रमांना निधीद्वारे पाठबळ दिले गेले. ज्यामुळे त्यांच्या वाढीच्या पुढील टप्प्याला चालना मिळाली.

पहिल्या पर्वात ३२ नवउद्यमी उपक्रमांना प्रत्येकी सरासरी १५ लाख रुपये वित्तसाह्य ‘कोटक बिझलॅब्स’ने उपलब्ध केले. तर दुसऱ्या पर्वात हे वित्तसाह्य प्रत्येकी ३० लाख रुपये असे वाढणार आहे. त्यामुळे एकूण अर्थसाह्याचा कोश पहिल्या पर्वातील ५ कोटींवरून, आता ९ कोटी रुपयांवर जाईल, असे कोटक महिंद्र बँकेचे सीएसआर आणि ईएसजी विभागाचे प्रमुख हिमांशू निवसरकर म्हणाले. मोठी स्वप्ने आणि नाविन्यपूर्ण कल्पनेच्या जोरावर भव्य काही करू इच्छिणाऱ्या स्टार्टअप्स संस्थापकांच्या कर्तृत्व क्षमतेबाबत व्यक्त केली गेलेली ही बांधिलकी असल्याचे निवसरकर यांनी नमूद केले.

कोटक बिझलॅब्स ॲक्सिलरेटर प्रोग्रामसाठी निवडण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान (डीप-टेक), शाश्वतता, स्वच्छ ऊर्जा, फिनटेक, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण तंत्रज्ञान (एडटेक), कृषी तंत्रज्ञान (अॅग्रीटेक) आणि आरोग्य तंत्रज्ञान (हेल्थटेक) आदींवर लक्ष केंद्रित केले जाईल. उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि मध्य भारतात हा उपक्रम आपल्या राष्ट्रीय पाऊलखुणा वाढवत असल्याचे निवसरकर म्हणाले.

आयआयटी दिल्लीच्या ‘फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर’ला (एफआयटीटी) नवीन सक्षम सहाय्यक म्हणून या उपक्रमाने आमंत्रित केले आहे. तर इन्क्युबेटर म्हणून आयआयएमए व्हेंचर्स, एनएसआरसीईएल – आयआयएम बंगळूरु आणि टी-हब यांचा सहभाग असेल.

आम्ही जे बोलतो, ते कृतीत आणण्याची ‘कोटक बिझलॅब्स’ ही एक पद्धत आहे. भारताचे भविष्य घडवू शकणाऱ्या धाडसी स्वप्नांना बळकटी देण्याचे हे एक महत्त्वाकांक्षी ध्येय आहे, असे कोटक महिंद्रा बँकेच्या बिझनेस बँकिंगचे प्रमुख आणि मुख्य विपणन अधिकारी रोहित भसीन म्हणाले. ‘हौसला है तो हो जाएगा’ ही या उपक्रमामागची भावना आहे, असेही ते म्हणाले.

कोटक बिझलॅब्स हा कोटक महिंद्र बँकेचा एक सीएसआर उपक्रम असून, डीपीआयआयटी-नोंदणीकृत स्टार्टअप्ससाठी दुसऱ्या पर्वाचे अर्ज खुले झाले आहेत. https://kotakbizlabs.accubate.app/ext/form/8675/1/apply या लिंकवर अर्ज व संबंधित तपशील उपलब्ध आहे.