पीटीआय, कोलकाता

संपत्ती निर्मितीचे साधन म्हणून गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडावरील विश्वास दिवसेंदिवस दृढ होत चालला आहे. गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असलेल्या सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणार गुंतवणूक देखील वाढते आहे. परिणामी देशातील म्युच्युअल फंड घराण्यांकडील एकत्रित व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ७० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. ज्यात वार्षिक २२.५ टक्के वाढ झाली आहे.

एप्रिल २०२५ मध्ये इंडेक्स फंड आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड अर्थात ‘ईटीएफ’सारख्या योजनांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेमध्ये २३.८० टक्के वाढ झाली आहे, त्यानंतर ‘ओपन-एंडेड इक्विटी फंडां’चा क्रमांक लागतो. एप्रिल २०२५ पर्यंत म्युच्युअल फंड फोलिओची संख्या ३०.२१ टक्क्यांनी वाढली आहे, तर या कालावधीत रोखे-केंद्रित योजनांच्या फोलिओ संख्येत मात्र १.१५ टक्क्यांनी घट झाली आहे, असे ‘इक्रा अनॅलिटीक्स’ने प्रसिद्धीस दिलेल्या टिपणांत म्हटले आहे

समभाग संलग्न अर्थात ‘इक्विटी’ म्युच्युअल फंडात येणार मासिक निधी प्रवाह २४,२६९ कोटी रुपयांपुढे पोहोचला आहे, जो म्युच्युअल फंडांवरील गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास दर्शवितो. एप्रिल २०२५ अखेर ‘एसआयपीं’ खात्यांची एकूण संख्या वार्षिक आधारावर पाच टक्क्यांनी वाढून ९.१४ कोटींवर पोहोचली आहे.