मुंबईः भारतात पुढील पाच ते १० वर्षांत, जवळजवळ १० कोटी नवीन मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांची भर पडेल आणि ते खर्च व्यवस्थापित करण्यापासून ते सक्रियपणे संपत्ती निर्माण करण्याकडे वाटचाल करतील. तथापि संपत्ती व्यवस्थापक, म्युच्युअल फंड वितरक आणि आर्थिक सल्लागार यांची याकामी निर्णायक भूमिका राहिल, असे निर्मल बंग सिक्युरिटीज या दलालीपेढीचे संचालक राकेश भंडारी यांनी प्रतिपादन केले.
म्युच्युअल फंडाकडून व्यवस्थापित मालमत्तेने (एयूएम) ७५ लाख कोटींपेक्षा जास्त टप्पा गाठला आहे, एसआयपीचा प्रवाह दरमहा २८,५०० कोटींहून अधिक झाला आहे आणि यूपीआयद्वारे दरमहा २० अब्जाहून अधिक व्यवहार सुरू आहेत. याचा अर्थ पैशाचे व्यवहार हे पूर्वीपेक्षा अधिक सहजतेने सुरू आहेत आणि भारतीय त्यांच्या कष्टाने कमावलेल्या बचतीद्वारे बाजारपेठा, डिजिटल व्यासपीठ आणि गुंतवणूक उत्पादनांवर विश्वास ठेवू लागले आहेत, असे भंडारी यांनी नमूद केले.
तथापि शोचनीय वास्तव असेही की, ६३ टक्के कुटुंबे हे जेमतेम एका आर्थिक उत्पादनाशी परिचित आहेत, तर प्रत्यक्षात म्युच्युअल फंडांतील सहभाग आजही केवळ ६.७ टक्के आहे. जागरूकता आणि स्वीकारार्हतेतील तफावत ही समस्या आणि सर्वात मोठी संधी देखील असल्याचे ते म्हणाले.
मुलाचे शिक्षण, स्वप्नातील घर, आरामदायी निवृत्ती या सारख्या जीवनातील ध्येयांसाठी योजना तयार करण्यास मदत करण्याची भूमिका सल्लागाराने विश्वासाने व सूज्ञतेने निभावली पाहिजे. विशेषतः महानगरांबाहेरील छोट्या शहरांमध्ये ही गरज लक्षात घेऊन, या अर्थपूर्ण क्षेत्रात करिअरच्या संधीकडे तरुणांनी पाहावे असे आवाहनही भंडारी यांनी केले.
वितरण जाळ्याची जबाबदारी वाहत आलेले भंडारी यांनी, सध्याचे वातावरण सल्लागारांची एक नवीन श्रेणी विकसित होण्याची संधी असल्याचे नमूद केले. जर कोणी म्युच्युअल फंड वितरक बनण्याचा विचार केला असेल, तर आतापेक्षा चांगला काळ नाही. याकामी निर्मल बंग सिक्युरिटीज शक्य ती सर्व मदत करण्यासह, प्रशिक्षण देऊन, संपत्ती निर्मितीमध्ये अर्थपूर्ण करिअर घडवण्यास मदत करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
नवीन गुंतवणूकदारांची त्सुनामी येत आहे, फक्त प्रश्न एकच की, त्यांना मार्गदर्शन करण्यास तयार सल्लागाराचा वर्ग आहे काय? देशातील असंख्य कुटुंबांना आर्थिक सुरक्षिततेच्या प्रवासात मदतीचा हात देण्यासाठी पुढे येण्याचे त्यांनी तरुणांना आवाहन केले.
