मुंबई: तोळ्यामागे लाख रुपयांवर गेलेले सोने आता आपल्या आवाक्याबाहेर गेल्याची दु:खद भावना अनेकांच्या मनांत निश्चितच असेल. तथापि प्राप्त परिस्थितीतही सोनेप्रेमींसाठी एक अत्यंत लवचिक आणि सोयीस्कर गुंतवणूक पर्याय प्रस्तुत झाला आहे. दीर्घकालीन भांडवलात वाढीची क्षमता असलेल्या सोन्यामध्ये स्मार्ट पद्धतीने तसेच अल्प अस्थिरतेसह गुंतवणुकीसाठी ही योजना प्रामुख्याने तयार करण्यात आलेली आहे.
उल्लेखनीय म्हणजे सोने या मालमत्ता बाळगणे आता किफायतशीर बनण्यासह, सोन्याच्या नवनवीन उच्चांक गाठणाऱ्या भावतेजीचा लाभही गुंतवणूकदारांना मिळविता येईल. अशी वैशिष्ट्यपूर्ण योजना ‘बडोदा बीएनपी परिबा गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड (एफओएफ)’ या नावाने दाखल झाली आहे. सोन्यांत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना एक सोपा, अल्पखर्चिक आणि व्यवहार्य गुंतवणुकीचा हा म्युच्युअल फंडाने खुला केलेला पर्याय आहे. बडोदा बीएनपी परिबा अॅसेट मॅनेजमेंट इंडिया या म्युच्युअल फंड घराण्याने दाखल केलेल्या योजनेचा नवीन फंड प्रस्ताव (एनएफओ) ४ ऑगस्ट २०२५ ला खुला होऊन, तो १४ ऑगस्ट २०२५ रोजी बंद होणार आहे.एनएफओ कालावधीत या योजनेत किमान १,००० रुपये (आणि त्यानंतर १ रुपयांच्या पटीत) एकरकमी गुंतवणूक करता येईल. शिवाय फक्त ५०० रुपयांपासून सुरू होणारी मासिक नियमित गुंतवणूक योजनेसह अर्थात ‘एसआयपी’चा पर्याय यात असल्याने आता सोन्याची गुंतवणूक प्रत्येक भारतीयाच्या आवाक्यात आणण्याचे उद्दिष्ट या योजनेतून पूर्णत्वाला गेले आहे, असे बडोदा बीएनपी परिबा एमएफच्या स्थिर उत्पन्न विभागाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत पिंपळे म्हणाले.
जागतिक पातळीवरील भू-राजकीय अनिश्चिततेमुळे जगभरातील मध्यवर्ती बँका त्यांच्या सोन्याच्या साठ्यात भर घालत आहेत. त्यातून वाढलेल्या सोन्याच्या मागणीचा लाभ सोन्याच्या किमतीला मिळत आहे आणि सोने येत्या काळात नवीन भाव उच्चांक दाखवेल, असे पिंपळे म्हणाले.या योजनेचे व्यवस्थापन गुरविंदर सिंग वासन, माधव व्यास आणि स्वप्ना शेलार या सांभाळणार आहेत.
सोन्याच्या किमतीबद्दल बोलताना योजनेचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक गुरविंदर सिंग वासन म्हणाले, गेल्या १० ते २५ वर्षांच्या कालावधीचा आढावा घेतला असता, सोन्याने शेअर्सइतकात किंबुहना काही प्रसंगी त्यापेक्षा सरस परतावा गुंतवणूकदारांना दिलेला आहे. सोन्याचा शेअर्सशी नकारात्मक सहसंबंध आहे आणि एकूण अस्थिरतेत सोन्याने त्याच्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओला स्थिरता प्रदान करणारा एक सक्षम घटक म्हणून मजबूत स्थान तयार केले आहे.