मुंबईः निष्क्रिय व्यवस्थापित अर्थात पॅसिव्ह म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला असून, याचा प्रत्यय म्हणजे मागील सहा वर्षांत या फंडांच्या ‘एयूएम’ अर्थात त्यांनी गुंतवणूकदारांकडून गोळा केलेल्या व्यवस्थापनयोग्य मालमत्तेत सहा पटीने वाढ झाली आहे, अशी माहिती मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

पॅसिव्ह फंडांची व्यवस्थापनयोग्य मालमत्ता २०२५ मध्ये १२.२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे, जी २०१९ मध्ये अवघी १.९१ लाख कोटी रुपये होती. याचा अर्थ सहा वर्षांत ती सहा पटीने वाढली आहे. मार्च २०२३ पासून केवळ मागील दोन वर्षांत, त्यात पावणे दोन पटीने गतिमान वाढ झाली आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे सक्रियपणे (ॲक्टिव्ह) किंवा निष्क्रियपणे (पॅसिव्ह) व्यवस्थापनाच्या पद्धतीनुसार दोन गट केले जाऊ शकतात. ही दोन प्रकारांतील वर्गवारी ही व्यवस्थापन शैली, गुंतवणूक उद्दिष्ट, खर्च आणि जोखीम या निकषांवर केली गेली आहे. देशातील ३,००० हून अधिक गुंतवणूकदार आणि १२० हून अधिक वितरकांचा कौल आजमावणाऱ्या मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाचे सर्वेक्षण सुचविते की, सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या ७६ टक्के गुंतवणूकदारांना ‘इंडेक्स फंड’ किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड अर्थात ईटीएफ या सारख्या पॅसिव्ह फंडांची पूर्ण माहिती आहे. शिवाय, सर्वेक्षणांत सहभागी ६८ टक्के गुंतवणूकदारांनी २०२५ मध्ये किमान एका निष्क्रिय फंडात गुंतवणूक केली आहे, ज्याचे प्रमाण २०२३ मध्ये ६१ टक्के होते. तथापि, यातून एक-तृतीयांश गुंतवणूकदारांचा अद्याप ॲक्टिव्ह फंडावर विश्वास कायम असल्याचेही दिसून येते.

मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाच्या यंदाच्या सर्वेक्षणाची ही तिसरी आवृत्ती आहे. त्यानुसार, पॅसिव्ह फंडांच्या निवडीमागे गुंतवणूकदारांनी दिलेल्या कारणांत, अत्यल्प खर्च (५४ टक्के), गुंतवणुकीचे विविधीकरण (४६ टक्के), सोपे स्वरूप आणि पारदर्शकता (४६ टक्के) आणि परतावा कामगिरी (२९ टक्के) इत्यादींचा समावेश आहे.

वितरकांमध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणातही असेच आकर्षण दिसून आले. प्रतिसादकर्त्या ९३ टक्के वितरकांनी पॅसिव्ह फंडाचे प्रकार समजून घेतल्याचे दिसून आले. त्यापैकी ४६ टक्के लोकांनी या फंड प्रकाराबद्दल त्यांना सखोल ज्ञान असल्याचे नमूद केले आणि ७० टक्के लोकांनी त्यांच्याकडील गुंतवणूकदारांना या फंडांचा पोर्टफोलिओत समावेशासाठी विक्री केल्याचे सांगितले. बहुतांश वितरक (९३ टक्के) विद्यमान २०२५-२६ आर्थिक वर्षामध्ये पॅसिव्ह फंडांची विक्री किमान ५ टक्क्यांनी वाढवण्याची योजना आखत असून, सध्या, त्यांच्या ७० टक्के ग्राहकांकडे तीनपेक्षा कमी पॅसिव्ह फंड असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भारतात, अलिकडच्या वर्षांत निष्क्रिय व्यवस्थापित गुंतवणूक धोरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ‘जागरूकता खूपच चांगली असून, गुंतवणूक आता केवळ इंडेक्स फंडांपुरती मर्यादित नाही. गुंतवणूकदार नाविन्यपूर्ण निष्क्रिय व्यवस्थापित धोरणांचे पर्याय अधिकाधिक स्वीकारत आहेत. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीमध्ये सहभागी होण्यासाठी शिस्तबद्ध मार्ग शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक महत्त्वाचा गुंतवणूक पर्याय म्हणून उदयास येत आहे,” असे मोतीलाल ओसवाल एएमसीचे निष्क्रिय व्यवसाय प्रमुख प्रतीक ओसवाल म्हणाले.

मजबूत दीर्घकालीन गुंतवणुकीचे वर्तन देखील सर्वेक्षणातून स्पष्टपणे दिसून आले. सर्वेक्षणात सहभागी ८५ टक्के गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राखून ठेवली आहे, तर फक्त १३ टक्के गुंतवणूकदार एक ते तीन वर्षांपर्यंत आणि फक्त २ टक्के गुंतवणूकदारांनी एका वर्षापेक्षा कमी काळासाठी पैसा गुंतविल्याचे आढळून आले. ५७ टक्के गुंतवणूकदार हे ‘एसआयपी’ आणि एकरकमी गुंतवणुकीचे संयोजन पसंत करतात, तर २६ टक्क्यांनी केवळ ‘एसआयपी’वर आधारीत गुंतवणूक नियोजन आखल्याचे सूचित केले.