मुंबई : देशातील आघाडीच्या श्रीराम समूहाने दक्षिण आफ्रिकेतील सनलॅम समूहासोबत भागीदारीसह संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. ‘श्रीराम वेल्थ’च्या माध्यमातून श्रीमंत वर्गातील (एचएनआय) गुंतवणूकदारांना संपत्ती व्यवस्थापन, कर्ज, जागतिक भांडवली बाजारात गुंतवणूक संधी, म्युच्युअल फंड आणि एआयएफ सारख्या विविध गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणुकीसाठी सेवा दिली जाणार आहे.
येत्या पाच वर्षांच्या कालावधीत ‘श्रीराम वेल्थ’ने एकूण व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (एयूएम) ५०,००० कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मुख्यतः महानगरे आणि उदयोन्मुख द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये विस्ताराचा निर्णयही कंपनीने जाहीर केला आहे. या संयुक्त उपक्रमामध्ये सॅनलम आणि श्रीराम समूहाची प्रत्येकी ५० टक्के अशी समान हिस्सेदारी असेल.
संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. देशात सध्या, फक्त १५ टक्के मालमत्ता व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केल्या जातात, तर इतर प्रगत देशांमध्ये हे प्रमाण ७५ टक्के आहे. संपत्ती व्यवस्थापन बाजारपेठेचा आकार सुमारे १.२ ट्रिलियन डॉलर आहे. नजीकच्या काळात तो सुमारे आठ पट वाढून सुमारे १० ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, असे श्रीराम वेल्थचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी विकास सतीजा म्हणाले. संपत्ती व्यवस्थापन सेवा सध्या २ कोटी ते २५ कोटी रुपयांच्या श्रेणीतील धनाढ्य ग्राहकांपासून सुरुवात करत आहोत. परंतु पुढील सहा ते नऊ महिन्यांत, १० लाख ते २ कोटी रुपयांच्या श्रेणीतील आणि नंतर २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त श्रेणीतील ग्राहकांना सेवा देण्याची कंपनीची योजना आहे.