मुंबई: सोन्यापाठोपाठ, चांदीच्या भावात अविरत निर्माण झालेल्या तेजी आणि पुरवठ्यातील समस्येनंतर आघाडीच्या म्युच्युअल फंड घराण्यांनी, चांदीवर आधारीत ‘सिल्व्हर ईटीएफ फंड-ऑफ-फंड योजने’त नवीन गुंतवणूक घेणे थांबवले होते. आता मात्र चांदीच्या दरात उतार आल्याने काही फंड घराण्यांनी गुंतवणूक पुन्हा सुरू केली आहे.
बाजारातील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर टाटा म्युच्युअल फंडने सिल्व्हर ईटीएफ फंड-ऑफ-फंड योजनेत (एफओएफ) नवीन गुंतवणूक पुन्हा सुरू केली आहे, असे शुक्रवारी सांगितले. कोटक म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड आणि एचडीएफसी म्युच्युअल फंडने देखील नवीन गुंतवणूक पुन्हा स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
म्युच्युअल फंड घराण्यांनी १४ ऑक्टोबरपासून ‘सिल्व्हर ईटीएफ’मधील एकरकमी गुंतवणूक, योजनेत स्विच-इन आणि सिस्टेमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) आणि सिस्टेमिक ट्रान्सफर प्लॅनची (एसटीपी) नवीन नोंदणी स्थगित केली होती. चांदीच्या किमतीवरील वाढते अधिमूल्य आणि कमी पुरवठ्यामुळे तात्पुरती स्थगिती हा एक खबरदारीचा उपाय होता. बाजारातील परिस्थिती सामान्य झाल्याचे लक्षात घेता, २४ ऑक्टोबरपासून टाटा सिल्व्हर एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) फंड-ऑफ-फंडमधील सर्व एकरकमी गुंतवणूक, स्विच-इन, नवीन एसआयपी आणि एसटीपी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
