मुंबई : म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच असून, सरलेल्या जून महिन्यात त्यायोगे आजवरची सर्वोच्च २६,६८८ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. एप्रिल महिन्यातील या माध्यमातून २६,६३२ कोटी रुपयांचा ओघ राहिला आहे, अशी म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संस्था ‘ॲम्फी’ने मंगळवारी माहिती दिली.

‘ॲम्फी’द्वारे जाहीर आकडेवारीनुसार, मे महिन्याअखेर ‘एसआयपी’ खात्यांची संख्याही वाढून ८.५६ कोटींवर पोहोचली आहे. या महिन्यांत एकूण १८ लाख लाख नवीन ‘एसआयपी’ खात्यांची भर पडली. ‘एसआयपी’ खात्यांची वाढती संख्या आणि विक्रमी योगदानातून गुंतवणूकदारांमधील वाढती विश्वासार्हता निदर्शनास येते. एप्रिल महिन्यात ‘एसआयपी’ खात्यांची संख्या ८.३८ कोटी नोंदवली गेली होती. इक्विटी अर्थात समभागसंलग्न श्रेणीतील गुंतवणुकीत घट झाली असली तरी, मे महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणाऱ्या मासिक गुंतवणुकीने नवीन उच्चांक गाठला आहे. ‘एसआयपी’च्या खात्यांमधील व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) १३.९० लाख कोटी रुपयांवरून १४.६१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ‘एसआयपी’ एयूएमचे म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत २०.२४ टक्के योगदान आहे, जे एप्रिलमध्ये १९.९ टक्के होते.

म्युच्युअल फंड उद्योगात गेल्या काही महिन्यांनंतर ‘एसआयपी स्टॉपेज रेशो’ अर्थात एसआयपी बंद करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारण ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात ५९ लाख खाती उघडण्यात आली, तर ४५ लाख एसआयपी खाती एकतर बंद करण्यात आली किंवा मुदत पूर्ण झाल्याने बंद केली गेली. मे महिन्याअखेर एकूण सक्रिय एसआयपी खाती आता ९.०६ कोटींवर आहेत.

‘इक्विटी’मधील ओघ आटला

इक्विटी म्युच्युअल फंडांमधील निव्वळ मासिक गुंतवणूक २१.६६ टक्क्यांनी घसरून मे महिन्यांत १९,०१३.१२ कोटी रुपये अशी एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आली आहे. चालू वर्षातील मार्चमध्ये २५,०८२ कोटी रुपये, फेब्रुवारीमध्ये २९,३०३ कोटी रुपये, जानेवारीमध्ये ३९,६८८ कोटी रुपये आणि डिसेंबरमध्ये ४१,१५६ कोटी रुपयांची गुंतवणूक इक्विटी फंडात झाली होती. त्यामुळे इक्विटी फंडांमधील गुंतवणुकीत घट होण्याचा हा सलग पाचवा महिना आहे. याबरोबरच म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण निव्वळ व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) एप्रिलमध्ये ६९.९९ लाख कोटी रुपयांवरून वाढून मे महिन्यांत पहिल्यांदाच ७२.२० लाख कोटी रुपयांवर पोहोचली. रोखे म्युच्युअल फंडांतून सरलेल्या मे महिन्यात १५,९०८ कोटी रुपये काढून घेण्यात आली. तर आधीच्या एप्रिल महिन्यात २.२ लाख कोटी रुपयांचा ओघ त्यात आला होता.

एकूणच, म्युच्युअल फंड उद्योगात मे महिन्यात २९,००० कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक झाली. मागील महिन्यात (एप्रिल २०२५) २.७७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. इक्विटी फंड श्रेणींमध्ये, फ्लेक्सी कॅप फंडांनी मे महिन्यात सर्वाधिक ३,८४१ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली. तथापि, इक्विटी-लिंक्ड बचत योजनांमधून (ईएलएसएस) ६७८ कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला. मे महिन्यात लार्ज-कॅप फंडांमध्ये १,२५० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी एप्रिलमधील २,६७१ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. मे महिन्यात मिड-कॅप फंडांमध्ये २,८०८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी मागील महिन्यांत ३,३१३ कोटी रुपयांची होती. त्याचप्रमाणे, स्मॉल-कॅप फंडांने मे महिन्यात ३,२१४ कोटी रुपये आकर्षित केले, जे एप्रिलमधील ३,९९९ कोटी रुपयांवरून कमी झाले आहेत.