मुंबई: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) गुरुवारी पूर्वघोषित १७,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेसाठी २५ नोव्हेंबर ही ‘रेकॉर्ड तारीख’ घोषित केली आहे. याचा अर्थ त्या तारखेला अथवा त्या आधी टीसीएसचे भागधारक म्हणून नोंद असलेल्यांना या योजनेसाठी पात्र मानले जाईल.

टीसीएसने सरलेल्या ११ ऑक्टोबरला प्रत्येकी ४,१५० रुपये किमतीला ही समभाग पुनर्खरेदी योजना प्रस्तावित केली आणि भागधारकांच्या हाती असलेले एकूण ४.०९ कोटी समभाग खरेदी करण्यासाठी कंपनीकडून एकूण १७,००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. रेकॉर्ड तारखेच्या घोषणेमुळे गुरुवारच्या सत्रात टीसीएसचा समभाग २.०३ टक्के वाढीसह ३,३९९ रुपयांवर बंद झाला. या बंद भावाच्या तुलनेतही भागधारकांना १७,५ टक्क्यांहून अधिक परतावा कमावण्याची संधी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा… टाटा टेक्नॉलॉजीज भागविक्रीतून ३०४२ कोटी उभारणार! टाटा समूहाची २० वर्षांत प्रथमच भांडवली बाजाराला धडक

हेही वाचा… ‘विंडफॉल’ करात कपात; डिझेल निर्यातीवरील करभार हलका

गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत ‘टीसीएस’ने आणलेली ही पाचवी समभाग पुनर्खरेदी योजना आहे. कंपनीने आतापर्यंत राबवलेल्या चार समभाग पुनर्खरेदी योजनेच्या माध्यमातून भागधारकांमध्ये, त्यांच्याकडील समभागांच्या बदल्यात ६६,००० कोटी रुपये वितरीत केले आहेत.