नवी दिल्ली: अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर दोन टप्प्यात ५० टक्के कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर, ऑगस्टमध्ये भारताची त्या देशाला निर्यात महिनागणिक सुमारे १४ टक्क्यांनी घसरून ६.८६ अब्ज डॉलरवर सीमित राहिल्याचे अधिकृत आकडेवारीने सोमवारी स्पष्ट केले. जुलैमध्ये भारताची अमेरिकेला झालेली निर्यात ८ अब्ज डॉलरच्या घरात होती. तथापि, एप्रिल ते ऑगस्ट अशा चालू आर्थिक वर्षाच्या पाच महिन्यांत अमेरिका हेच भारतीय वस्तूंसाठी अव्वल निर्यातीचे ठिकाण राहिले आहे, असेही वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी दर्शविते. वार्षिक आधारावर ऑगस्टमध्ये अमेरिकेला झालेली निर्यात ही ७.१५ टक्क्यांनी वाढली आहे.

अमेरिकेने ७ ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लागू केले होते आणि त्यानंतर रशियन खनिज तेलाची खरेदी केल्याबद्दल शिक्षा म्हणून अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक शुल्काची आकारणी २७ ऑगस्टपासून सुरू केली. तरी त्याचे जशी भीती व्यक्त केली जात होती, तितके विपरित परिणाम भारताच्या निर्यातीवर दिसलेले नाहीत. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाचे शिष्टमंडळ उद्या (मंगळवारी) भारतात दाखल होत असून, उभयतांमधील व्यापारविषयक वाटाघाटीतून टॅरिफच्या तिढ्यावर तोडगा काढला जाण्याबाबत मोठ्या आशा आहेत.

अमेरिकेपाठोपाठ, भारताकडून चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक निर्यात झालेल्या देशांमध्ये संयुक्त अरब अमिरात (३.२४ अब्ज डॉलर), नेदरलँड्स (१.८३ अब्ज डॉलर), चीन (१.२१ अब्ज डॉलर्स) आणि ब्रिटन (१.१४ अब्ज डॉलर) यांचा समावेश आहे, असे वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी सांगते. त्या उलट भारताकडून होणाऱ्या आयातीबाबत १०.९ अब्ज डॉलरसह चीन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर रशिया (४.८३ अब्ज डॉलर), संयुक्त अरब अमिरात (४.६६ अब्ज डॉलर), अमेरिका (३.६ अब्ज डॉलर) आणि सौदी अरेबिया (२.५२ अब्ज डॉलर) अशी क्रमवारी लागते.

एकंदर निर्यातीत ६.७ टक्क्यांची वाढ

सरलेल्या ऑगस्टमध्ये भारताची निर्यात वार्षिक तुलनेत ६.७ टक्क्यांनी वाढून, ३५.१ अब्ज डॉलर झाली आहे, तर आयात १०.१२ टक्क्यांनी घसरून ६१.५९ अब्ज डॉलरवर सीमित राहिली आहे. ऑगस्टमध्ये सोन्याची आयात जवळपास ५६ टक्क्यांनी घटल्याचा एकूण आयातीत लक्षणीय घसरण झाली आहे. ज्यामुळे ऑगस्टमध्ये आयात व निर्यातीतील तफावत असलेली व्यापार तूट देखील २६.४९ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ३५.६४ अब्ज डॉलरच्या पातळीवर होती.