e-Passport Detail Information in Marathi: पासपोर्ट हा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. पासपोर्ट आपल्या नागरिकत्वाचा आणि वैयक्तिक माहितीचा पुरावा असतो. विदेशात प्रवास करायचा असेल तर त्यासाठी पासपोर्ट अनिवार्य असतो. पासपोर्टसाठी अर्ज केल्यावर, आवश्यक कागपत्रांची पूर्तता केल्यावर पडताळणीनंतर तो परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी केला जातो.

पासपोर्ट म्हणजे काय?

पासपोर्ट हा केंद्र सरकारने जारी केलेला अधिकृत प्रवास दस्तऐवज आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी व्यक्तीची ओळख आणि नागरिकत्वाचा पुरावा आहे. पासपोर्टमुळे संबंधित व्यक्तीला विदेशात प्रवेश करता येतो, तात्पुरतं राहता येतं, स्थानिक मदत आणि संरक्षण मिळवता येते.

पासपोर्टचे प्रकार:

सामान्य पासपोर्ट –

हा पासपोर्ट सामान्य नागरिकांसाठी असतो आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करण्यासाठी वापरतात. सामान्य पासपोर्टचा रंग निळा असतो.

अधिकृत पासपोर्ट
हा पासपोर्ट सरकारी अधिकाऱ्यांसाठी असतो, जे अधिकृत कामासाठी परदेशात प्रवास करत असतात. या पासपोर्टचा रंग पांढरा असतो.

राजकीय पासपोर्ट
हा पासपोर्ट उच्च-स्तरीय सरकारी अधिकारी आणि मुत्सद्दी अधिकाऱ्यांसाठी असतो. या पासपोर्टचा रंग मरून असतो.

आपत्कालीन प्रमाणपत्र (Emergency Certificate)

इमर्जेन्सी सर्टिफिकेट म्हणजेच आपत्कालीन प्रमाणपत्र हे तात्पुरते प्रमाणपत्र आहे, जे आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या प्रवाशाला जारी केले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे सामान्य पासपोर्ट उपलब्ध नसतो, अशावेळी हे प्रमाणपत्र दिले जाते.

आपल्याला नियमित पासपोर्ट व दुसरा ई-पासपोर्ट मिळतो. आज आपण ई पासपोर्टबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

ई-पासपोर्ट किंवा बायोमेट्रिक पासपोर्ट हा नेक्स्ट जनरेशन प्रवास दस्तऐवज आहे. यात बिल्ट-इन चिप असते, ज्यामुळे तुमच्या पासपोर्टमध्ये ओळखसंदर्भात फसवूक होण्याचा धोका नसतो. भारत सरकारने पासपोर्ट सेवांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासात सुरक्षा वाढवण्यासाठी ई-पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे.

ई-पासपोर्टसाठी अर्ज कसा करायचा? अर्ज केल्यानंतर त्याचे स्टेटस कसे तपासायचे? ई-पासपोर्ट डाउलनोड कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत? ते पाहुयात. क्लिअर टॅक्सने यासंदर्भात माहिती दिली आहे.

ई-पासपोर्ट म्हणजे काय?

ई-पासपोर्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चिप असलेला पासपोर्ट होय. यात संबंधित व्यक्तीची बायोमेट्रिक आणि वैयक्तिक माहिती असते. हा पासपोर्ट हरवण्याची, चोरी होण्याची भीती नसते. तसेच त्यात छेडछाड होण्याचाही धोका नसतो.

ई-पासपोर्टची वैशिष्ट्ये

  • फ्रंट कव्हरवर एम्बेड केलेली चिप
  • बोटांचे ठसे, फोटो, आयरिस स्कॅनसारखे बायोमेट्रिक तपशील
  • नाव, जन्मतारीख, पासपोर्ट क्रमांक इत्यादी माहिती
  • सुरक्षित अॅक्सेससह कॉन्टॅक्टलेस चिप
  • आयसीएओ स्टँडर्ड्सचे पालन
  • बनावट किंवा डुप्लिकेट पासपोर्टचा धोका कमी

ई-पासपोर्टमध्ये कोणती माहिती असते?

पासपोर्टमधील ई-चिपमध्ये –

  • संबंधित व्यक्तीचा फोटो
  • बायोमेट्रिक डेटा
  • पूर्ण नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता इत्यादी माहिती.
  • पासपोर्ट जारी करणाऱ्या अथॉरिटीची डिजिटल सही
  • युनिक पासपोर्ट आयडी, पासपोर्ट जारी करण्याची तारीख आणि एक्स्पायरी डेट
ई-पासपोर्ट (फोटो – फायनान्शिअल एक्सप्रेस)

बायोमेट्रिक ई-पासपोर्ट कसे काम करते?

इमिग्रेशन चेकपॉइंट्सवर स्कॅन केल्यावर –

  • ही चिप वायरलेस पद्धतीने एन्क्रिप्टेड डेटा ट्रान्समिट करते.
  • सिस्टिम प्रवाशाच्या लाईव्ह स्कॅनबरोबर आधीचे संग्रहित बायोमेट्रिक्स मॅच करते.
  • व्हेरिफिकेशन वेगाने होते. तसेच हे जास्त सुरक्षित आहे, ज्यामुळे पासपोर्टचा गैरवापर, छेडछाड व फसवणूक टाळता येते.

भारतात ई-पासपोर्टसाठी अर्ज कसा करायचा?

तुम्ही पासपोर्ट सेवा पोर्टल या अधिकृत वेबसाइटवरून ई-पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  • पासपोर्ट सेवा वेबसाइटवर जा.
  • नोंदणी किंवा लॉगिन करा आणि ई-पासपोर्ट अर्जाचा फॉर्म भरा.
  • तुमचे पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (POPSK) निवडा.
  • ई-पासपोर्टसाठी लागणारे शुल्क भरा.
  • अपॉइंटमेंट शेड्यूल करा.
  • बायोमेट्रिक डेटा कलेक्शन आणि कागदपत्रांच्या व्हेरिफिकेशनसाठी PSK/POPSK ला भेट द्या.

ई-पासपोर्ट डाउनलोड कसा करायचा? ई-पासपोर्टचे स्टेटस कसे तपासायचे?

तुम्ही ई-पासपोर्ट स्वतः डाउनलोड करू शकत नाही, कारण ते एक फिजिकल डॉक्युमेंट आहे. त्यात चिप एम्बेड केलेली असते. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून ई-पासपोर्टचे स्टेटस ऑनलाइन तपासू शकता –

  • पासपोर्ट सेवा स्टेटस ट्रॅकर वर जा.
  • तुमचा फाइल नंबर आणि जन्मतारीख भरा.
  • हे केल्यानंतर तुमच्या पासपोर्ट अर्जाचे रिअल-टाइम स्टेटस अपडेट्स दिसेल.

ई पासपोर्टचा वापर आणि फायदे

  • ई-पासपोर्टमुळे डेटा सुरक्षित राहतो
  • इमिग्रेशन लवकर होते आणि ई-गेट अॅक्सेस मिळतो
  • ओळख (Identity) संदर्भातील फसवणुकीचा धोका कमी
  • ई-पासपोर्ट आयसीएओ मार्गदर्शक तत्त्वांनुसार जागतिक स्तरावर स्वीकारला जातो
  • आंतरराष्ट्रीय विमानतळांवर व्हेरिफिकेशन व्यवस्थित होते

ई पासपोर्टसाठी भारतात किती शुल्क लागते?

ई-पासपोर्टसाठी नियमित पासपोर्टइतकेच शुल्क आकारले जाते.

पासपोर्टचा प्रकारपृष्ठेवैधताशुल्क (सामान्य) शुल्क (तात्काळ)
सामान्य पासपोर्ट३६१० वर्षे१,५००३,५००
सामान्य पासपोर्ट६०१० वर्षे२,०००४,०००
मायनर पासपोर्ट३६५ वर्षे१,०००३,०००

भारतात ई-पासपोर्ट जारी करणारी शहरं

  • मुंबई
  • दिल्ली
  • बेंगळुरू
  • चंदीगड
  • कोची
  • चेन्नई
  • लखनऊ
  • अहमदाबाद
  • हैदराबाद
  • कोलकाता

ई-पासपोर्ट व नियमित पासपोर्टमधील फरक

वैशिष्ट्यैई-पासपोर्टनियमित पासपोर्ट
एम्बेड केलेली चिपहोनाही
बायोमेट्रिक डेटाहो (बोटांचे ठसे, फोटो, आयरिस स्कॅन)नाही
इमिग्रेशनइमिग्रेशन जलद होतेजलद होत नाही
सुरक्षाखूप जास्त सुरक्षित (डिजिटल एन्क्रिप्शन)बेसिक
फसवणूक प्रतिबंधखूप जास्तमर्यादित

सरकारने यावर्षी बदलले पासपोर्टचे नियम

केंद्र सरकारने मार्च २०२५ मध्ये पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल केले. पासपोर्ट नियम, १९८० या नियमावलीतील नवे नियम अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर लागू होतील.

१. जन्म दाखला

केंद्र सरकारच्या सुधारित नियमांनुसार १ ऑक्टोबर २०२३ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना पासपोर्टसाठी अर्ज करताना जन्मदाखला देणे अनिवार्य करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, महानगरपालिका किंवा जन्म-मृत्यू नोंदणी कायदा, १९६९ अंतर्गत कोणत्याही तत्सम प्राधिकरणाकडूनच जन्म दाखला वितरित केलेला असावा. विशेष म्हणजे १ ऑक्टोबर २०२३ पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना हा नियम लागू होत नाही. ते पूर्वीप्रमाणेच एसएससी बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना किंवा इतर तत्सम सरकारी ओळखपत्राचा पुरावा सादर करू शकतात.

२. निवासी पत्ता

आजवर पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पासपोर्ट धारकाचा कायमचा पत्ता छापलेला असायचा. पण यापुढे शेवटच्या पानावर पत्ता छापला जाणार नाही. त्याऐवीज तिथे बारकोड छापला जाईल. इमिग्रेशन अधिकारी हा बारकोड स्कॅन करून पत्त्याबाबत माहिती मिळवू शकतील.

३. पालकांची नावे हटविणार

पासपोर्टच्या शेवटच्या पानावर छापले जाणारे पालकांचे नाव यापुढे छापले जाणार नाही. या बदलामुळे एकल पालक किंवा विभक्त कुटुंबांना दिलासा मिळणार नाही. त्यांना जाहीर करावी न लागणाऱ्या माहितीबाबत गोपनीयता राखता येणार आहे.

४. पासपोर्ट सेवा केंद्राची संख्या वाढवली

पासपोर्टसाठी अर्ज करणे, मजकूरात बदल करणे, अशी कामे पासपोर्ट सेवा केंद्राद्वारे केली जातात. आता ही केंद्रे वाढवली जाणार आहेत. पुढील पाच वर्षांत सेवा केंद्रांची संख्या ४४२ वरून ६०० केली जाणार आहे.