मुंबई : इटर्नल अर्थात पूर्वाश्रमीची झोमॅटोच्या बाजार भांडवलाने ३.१६ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत इटर्नलने २९.३० टक्के, तर भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून ४१७.८८ टक्के असा बहुप्रसवा परतावा दिला आहे. इटर्नलने बाजार भांडवलाच्या बाबतीत खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांना मागे सारले आहे. यामध्ये अदानी पोर्ट्स, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) इत्यादींचा समावेश आहे. मंगळवारच्या सत्रात इटर्नलच्या समभागाचा भाव १.२४ टक्क्यांनी वधारून ३२७.३० रुपयांवर बंद झाला.

सध्याच्या बाजार भांडवलानुसार, अदानी पोर्ट्स (३.०३ लाख कोटी), ओएनजीसी (२.९६ लाख कोटी), भारत इलेक्ट्रॉनिक्स (२.९४ लाख कोटी), अदानी एंटरप्रायझेस (२.७७ लाख कोटी), विप्रो (२.६६ लाख कोटी), टाटा मोटर्स (२.६३ लाख कोटी), कोल इंडिया (२.४४ लाख कोटी) या आघाडीच्या कंपन्यांना इटर्नलने मागे सारले आहे. सध्या बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज १९.०१ लाखांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ एचडीएफसी बँक (१४.८४ लाख कोटी) आणि भारती एअरटेलचा (११.०६ लाख कोटी) यांचा क्रमांक लागतो.