Stock Market Crash Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज शेअर बाजार लालेलाल झालेला पाहायला मिळाला. मागच्या सप्टेंबर महिन्यापासून बाजारात १.९ टक्क्यांची घसरण झाली असून गुंतवणूकदारांची १८ टक्के नफा वाया गेला आहे. मागच्या वर्षी २६ सप्टेंबर २०२४ रोजी बाजाराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर आज सेन्सेक्समध्ये १६ टक्के (१२,२५६ अंक) आणि निफ्टीमध्ये १८ टक्के (३,९९१ अंक) एवढी घसरण झाली आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये आज १,४०० अंकाची घसरण झाली आणि निर्देशांक ७३,२०१ वर स्थिरापला. तर निफ्टीमध्ये ४२६ अंकाची घसरण होऊन निर्देशांक २२,११९ वर स्थिरावला. आजच्या घसरणीमागे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कारणे असल्याचे सांगितले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात विक्रमी घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा झटका लागला आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज ६.७२ लाख कोटी रुपयांची घट होऊन ती ३८६.३८ लाख कोटी रुपयांवर आली आहे. आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या स्थितीत पाहायला मिळाले. आयटी, ऑटो, मीडिया आणि टेलिकॉमच्या शेअर्सना विक्रीचा फटका बसला. प्रत्येक स्टॉक २ ते ३ टक्क्यांच्या दरम्यान घसरला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही घसरण पाहायला मिळाली.

१. अमेरिकेच्या आर्थिक आकड्यांमुळे चिंता वाढली

अमेरिकेच्या जीडीपीमधील आकडे कमकुवत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली असून जगभरातील बाजारांवर त्याचा प्रभाव दिसून येत आहे. चौथ्या तिमाहीत जीडीपी केवळ २.३ टक्के असून अपेक्षापेक्षा तो खूपच कमी आहे. यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजार कमकुवत झालाच आहे. ज्यामुळे विदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेत आहेत.

२. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातकर वाढीच्या निर्णयाचा परिणाम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयातकर वाढविण्याची घोषणा केली आहे. ४ मार्चपासून मेक्सिको आणि कॅनडा वरून येणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लावला जाईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. तसेच चीनवरून येणाऱ्या वस्तूंवरही १० टक्के अतिरिक्त आयातकर लावला जाईल. युरोपियन संघाच्या वस्तूंवरही २५ टक्के आयातकर लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

३. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्री

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) गेल्या काही दिवसांपासून आपली गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावत आहेत. फेब्रुवारी महिन्यात विदेशी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४६,००० कोटींच्या शेअर्सची विक्री केली. तर जानेवारी महिन्यात १.३३ लाख कोटींच्या शेअर्सची विक्री झाली होती. यामुळे बाजारात जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. या विक्रीमुळे रुपयावरील दबाव वाढत आहे. अशातच आता रुपयाची किंमतही आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

४. आयटी सेक्टरमध्ये मोठी घसरण

आज बाजारात आयटी स्टॉक्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. एनविडिया सारख्या (Nvidia) अमेरिकन कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे भारतीय आयटी क्षेत्रावरही त्याचा परिणाम जाणवला. आयटी क्षेत्रामध्ये ४ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. टेक महिंद्रा, एमफासिस, पर्सिस्टंट सिस्टम हे शेअर्स सर्वात खाली गेले. अमेरिकेच्या बाजारात पुढील काही दिवसात घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे आयटी कंपन्यांना अधिक नुकसान होऊ शकते.

५. जीडीपी अहवालाची प्रतिक्षा

भारतीय गुंतवणूकदार तिसऱ्या तिमाहीतील जीडीपीच्या अहवालाची वाट पाहत आहेत. ज्यामुळे बाजारात अनिश्चितता पाहायला मिळत आहे. अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ या तिमाहीतील भारताच्या जीडीपीचा विकासदर ६.३ टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ६.८ टक्क्यांचे अनुमान वर्तविले होते. त्यापेक्षा हा आकडा थोडा कमी आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five reasons why the market is falling today nifty slides to 9 month lows kvg