Hinduja Group Chairman Gopichand Hinduja Passes Away: जगप्रसिद्ध हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. व्यावसायिक वर्तुळात जी. पी. हिंदुजा या नावाने लोकप्रिय असलेले गोपीचंद हिंदुजा गेल्या काही आठवड्यांपासून आजारी होते.

ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य रामी रेंजर यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, त्यांनी एक निवेदन जाहीर केले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले की, “प्रिय मित्रांनो, अत्यंत जड अंतःकरणाने, मी तुमचे प्रिय मित्र जीपी हिंदुजा यांच्या दुःखद निधनाची माहिती देत आहे. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. मला त्यांचा अनेक वर्षांचा सहवास मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. त्यांनी नेहमीच चांगल्या कामांना पाठिंबा दिला. त्यांत्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली जी भरून काढणे कठीण आहे.”

मे २०२३ मध्ये त्यांचे मोठे भाऊ श्रीचंद हिंदुजा यांच्या निधनानंतर, गोपीचंद हिंदुजा यांनी ट्रक, ल्युब्रिकंट्स, बँकिंग आणि केबल टेलिव्हिजन असे अनेक व्यवसाय असलेल्या बहुराष्ट्रीय हिंदुजा ग्रुपचे अध्यक्षपद स्वीकारले होते. यूके संडे टाईम्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, ते सलग सात वर्षे युनायटेड किंग्डममधील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.

हिंदुजा कुटुंब बहुराष्ट्रीय हिंदुजा ग्रुपवर चालवते. या ग्रुपचा रसायने, ऊर्जा, ऑटोमोबाईल्स, बँकिंग, मीडिया आणि रिअल इस्टेटसह विविध क्षेत्रात व्यवसाय आहे. फोर्ब्सच्या वृत्तानुसार, हिंदुजा कुटुंबाची एकूण संपत्ती अंदाजे १,७०,९८० कोटी रुपये आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये ते ११ व्या आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत १४६ व्या क्रमांकावर आहेत.

परमानंद दीपचंद हिंदुजा यांचे दुसरे पुत्र गोपीचंद हिंदुजा यांचा जन्म १९४० मध्ये झाला. त्यांनी १९५९ मध्ये मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्यांना वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून कायद्याची मानद डॉक्टरेट आणि लंडनच्या रिचमंड महाविद्यालयातून अर्थशास्त्राची मानद डॉक्टरेट देखील मिळाली आहे.

हिंदुजा ग्रुपची स्थापना गोपीचंद हिंदुजा यांचे वडील परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी केली होती. १९१९ मध्ये इराणला स्थलांतरित होण्यापूर्वी त्यांचे वडील भारतातील सिंध प्रदेशात (आता पाकिस्तान) व्यवसाय करत होते. १९७९ मध्ये, हिंदुजा बंधूंनी त्यांचा तळ इराणहून लंडनला हलवला. त्यांच्या लंडनमधील घरांपैकी एक म्हणजे कार्लटन हाऊस टेरेस, बकिंगहॅम पॅलेसजवळ आहे.