Hurun Rich List 2025 : मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांची एकूण संपत्ती ९.५५ लाख कोटी रुपये असल्याची बाब M3M इंडियाने हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटबरोबर मिळून प्रकाशित केलेल्या M3M ‘हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५’च्या १४ व्या आवृत्तीमधून समोर आली आहे. या यादीत गौतम अदाणी आणि कुटुंब अंबानींच्या थोड्या फरकारने मागे राहिले आहे. अदाणी ८.१५ लाख कोटी रूपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

रोशनी नादर मल्होत्रा आणि कुटुंब हे पहिल्यांदाच टॉप तीनमध्ये सहभागी झाले आहे, त्यांची संपत्ती २.८४ लाख कोटी आहे. त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.

२०२५ मधील टॉप १० श्रीमंत भारतीयांची यादी:

क्रमांकनावसंपत्ती २०२५ (कोटी रुपये)संपत्ती बदल (टक्के)कंपनी
मुकेश अंबानी आणि कुटुंब९५५४१०-६ टक्केरिलायन्स इंडस्ट्रीज
गौतम अदाणी आणि कुटुंब८१४७२०-३० टक्केअदाणी
रोशनी नादर मल्होत्रा ​​आणि कुटुंब२८४१२०नवीन एन्ट्रीएचसीएल
सायरस एस. पूनावाला आणि कुटुंब२४६४६०-१५ टक्केसीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब२३२८५०-१ टक्केआदित्य बिर्ला
निरज बजाज आणि कुटुंब२३२६८०४३ टक्केबजाज ग्रुप
दिलीप संघवी२३०५६०-८ टक्केसन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज
अझीम प्रेमजी आणि कुटुंब२२१२५०१६ टक्केविप्रो
गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंब१८५३१०-४ टक्केहिंदुजा
१०राधाकिशन दमाणी आणि कुटुंब१८२९८०-४ टक्केअव्हेन्यू सुपरमार्ट्स

या यादीमधून भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत वेगाने झालेली वाढ पाहायला मिळते. देशातील अब्जाधिशांची संख्या ३५० च्या वर पोहचली आहे. १३ वर्षांपूर्वी यादी पहिल्यांदा प्रकाशित झाली त्यानंतर हा आकडा तेरा वर्षात सहापट वाढला आहे. या यादीतील सर्व व्यक्तींची एकत्रित संपत्ती १६७ लाख कोटी रूपयांवर पोहोचली आहे, जी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (GDP) जवळपास निम्मी आहे.

या यादीत अनेक तरुण उद्योजकांचा देखील समावेश झाला आहे. पेरप्लेक्सिटीचे अरविंद श्रीनिवास (३१) हे भारतातील सर्वात तरूण अब्जाधीश बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती २१, १९० कोटी रुपये आहे.

बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान हा देखील अब्जाधीशांच्या यादीत सहभागी झाला आहे, त्यांची संपत्ती १२४९० कोटी रुपये झाली आहे.

संपत्तीत झालेल्या वाढीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, नीरज बजाज आणि त्यांच्या कुटुंबाने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. त्यांच्या संपत्तीत ६९८७५ कोटी रुपयांची भर पडली असून ती आता २.३३ लाख कोटी रुपयांवर पोहचली आहे. त्याचबरोबर, पेटीएमचे (Paytm) संस्थापक विजय शेखर शर्मा देखील कंपनीच्या शेअरच्या किमतीत १२४ टक्के वाढ झाल्यामुळे, १५९३० कोटी रुपयांच्या संपत्तीसह अब्जाधीशांच्या यादीत परतले आहेत.