करदात्यांसाठी दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. प्राप्तीकर विभागाने आयटीआर दाखल (ITR Filing New Date) करण्याची तारीख आणखी एक दिवस वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने २०२५-२०२६ साठी प्राप्तीकर विवरणपत्र म्हणजेच ITR भरण्याची अंतिम तारीख १५ ऐवजी आता १६ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १५ सप्टेंबर म्हणजेच सोमवार ही आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख होती, परंतु त्याच दिवशी लाखो वापरकर्त्यांना आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर प्रचंड ट्रॅफिक आणि तांत्रिक समस्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. या कारणास्तव, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अंतिम मुदत आणखी एक दिवस वाढवली आहे. CBDT ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, आयटीआर दाखल करणे अधिक सुलभ करण्यासाठी, शेवटची तारीख एक दिवस वाढवून १६ सप्टेंबर करण्यात आली आहे.

प्राप्तीकर विभागाने काय म्हटलं आहे?

प्राप्तीकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वेळी १५ सप्टेंबरपर्यंत ७.३ कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले होते, जे गेल्या वर्षीच्या ७.२८ कोटी फाइलिंगच्या आकड्यापेक्षा जास्त आहे. हे सतत वाढती कर अनुपालन आणि कर बेसचा विस्तार दर्शवतं आहे. अनेक करदात्यांनी आणि चार्टर्ड अकाउंटंटनी सोशल मीडियावर तक्रार केली की पोर्टलवर लॉग इन करणे, आयटीआर अपलोड करणे, आगाऊ कर भरणे आणि एआयएस डाऊनलोड करणे यात समस्या येत आहेत. यावर, विभागाने स्पष्ट केले की पोर्टल “योग्यरित्या काम करत आहे” आणि लोकांना ब्राउझर कॅशे क्लिअर करण्याचा किंवा दुसरा ब्राउझर वापरण्याचा सल्ला दिला. तसेच, विभागाने ईमेल आयडीवर पॅन आणि मोबाइल नंबर पाठवण्याचा पर्याय देखील दिला, जेणेकरून वैयक्तिक समस्या सोडवता येतील.