India Resumes Purchasing Russian Crude Oil: भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यामुळे रशियाला युक्रेनविरोधात युद्धासाठी निधी मिळत असल्याचा आरोप करत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. दरम्यान जुलैमध्ये भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियन कच्च्या तेलाची आयात थांबवली होती. मात्र, आता सवलती वाढल्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सप्टेंबर आणि ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी रशियन कच्च्या तेला खरेदी पुन्हा सुरू केली आहे. याबाबत रॉयटर्स वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका, भारतावर रशियन तेल खरेदी थांबवण्यासाठी सातत्याने विविध मार्गांनी दबाव टाकत आहे. मात्र, भारताने अमेरिकेचा दबाव झुगारून टाकल्याचे चित्र आहे.

सवलतींमुळे रशियन तेलाला पुन्हा मागणी

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या प्रमुख युरल्स क्रूडवरील सवलती प्रति बॅरल सुमारे ३ डॉलर्सपर्यंत वाढल्या आहेत. यामुळे भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या रशियन कच्च्या तेलाकडे पुन्हा आकर्षित झाल्या आहेत. याचबरोबर चीनने देखील रशियन कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे.

आर्थिक लाभ लक्षात घेता…

रॉयटर्सने अधोरेखित केले आहे की, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या सामान्यतः त्यांच्या क्रूड सोर्सिंगवर भाष्य करत नाहीत. पण, इंडियन ऑइलने अलीकडेच विश्लेषकांना सांगितले होते की, ते आर्थिक लाभ लक्षात घेता रशियन तेल खरेदी करत राहतील. यातून हे स्पष्ट होते की, आकर्षक सवलतींमुळे भारतीय तेल कंपन्यांकडून रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीचा प्रवाह चालू राहील.

रशियासाठी भारत खूप महत्त्वाचा

भारत त्यांच्याकडून कच्चे तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेने, भारतावर लादलेल्या निर्बंधांवर रशियाने आज टीका केली आहे. “बाह्य दबावाला न जुमानता भारत-रशिया ऊर्जा सहकार्य सुरू राहील याची आम्हाला खात्री आहे”, असे रशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबुश्किन म्हणाले.

अमेरिकेवर दुटप्पीपणाचा आरोप करत बाबुश्किन म्हणाले, “निर्बंध लादणाऱ्यांनाच फटका बसत आहे, ते राष्ट्रीय हितांचा अनादर करत आहेत. रशियाचे तेल खरेदी न करण्यासाठी भारतावर दबाव आणणे अन्याय्य आहे.”

यावेळी त्यांनी यावर भर दिला की, रशिया भारतासोबतच्या धोरणात्मक भागीदारीला महत्त्व देतो आणि आव्हानात्मक परिस्थितीत भारताच्या मागे ठामपणे उभे राहण्यास वचनबद्ध आहे . “जर भारतीय वस्तू अमेरिकन बाजारपेठेत जाऊ शकत नसतील तर त्या रशियात येऊ शकतात आणि रशियासाठी भारत खूप महत्त्वाचा आहे”, असेही बाबुश्किन यांनी स्पष्ट केले.