Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात कारवाई करत तब्बल कोट्यवधींच्या मालमत्तेवर टाच आणली होती. तसेच त्यांच्या संबंधित काही ठिकाणी छापेमारी देखील केली होती. त्यानंतर आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीचा भाग म्हणून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उद्योगपती अनिल अंबानींना दुसऱ्यांदा समन्स बजावले आहेत.
अनिल अंबानी यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढील आठवड्यात पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी हजर राहावं लागण्याची शक्यता आहे. कथित बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी यांना १४ नोव्हेंबर रोजी ईडीने हजर राहण्यास सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआयच्या हवाल्याने फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.
अनिल अंबानींची याआधी ईडी कार्यालयात चौकशी
ईडीने जुलै महिन्यातही अनिल अंबानी त्यांचे सहकारी आणि ग्रुप कंपन्यांवर छापे टाकले होते. ५ ऑगस्ट रोजी अनिल अंबानी यांना दिल्ली येथील ईडी मुख्यालयात बोलवण्यात आलं होतं आणि त्यांची चौकशीही करण्यात आली होती. ईडीचा हा तपास प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्टचया अंतर्गत सुरु आहे. अनिल अंबानी यांच्यावर देश सोडून जाण्याचीही बंदी घालण्यात आलेली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
२०१७ ते २०१९ या काळात एका बँकेकडून रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपच्या कंपन्यांना वेगवेगळ्या प्रमाणात एकूण ३ हजार कोटींची कर्जे वितरीत करण्यात आल्याचा आरोप आहे. या सगळ्या व्यवहारात बेकायदेशीर बाबी घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची चौकशी सध्या ईडीकडून करण्यात येत आहे. ही कर्जाची रक्कम वळती करण्यासाठी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना, प्रमोटर्सला लाच दिली गेल्याचाही संशय ईडीला असून त्या अनुषंगाने देखील तपास करण्यात येत आहे.
याच कारवाईचा भाग म्हणून आता मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. अनिल अंबानी यांच्या कंपन्यांना कर्जाची रक्कम वळती करण्यासाठी बँकेकडून नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करण्यात आल्याचं ईडीच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांच्या तीन हजार कोटींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या.
लूकआऊट नोटीस जारी
उद्योगपती अनिल अंबानी यांच्याविरोधात ईडीने काही दिवसांपूर्वी लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्यामुळे अनिल अंबानी यांना देश सोडून बाहेर जाता येणार नाही.
