Larry Ellison : ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. लॅरी एलिसन यांनी त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच जागतिक संपत्तीच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलॉन मस्क यांना लॅरी एलिसन यांनी मागे टाकलं असून आता जगभरात एलिसन यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

ओरेकल कॉर्पोरेशनच्या स्टॉकमध्ये एका दिवसांत अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे लॅरी एलिसन यांच्या एकूण संपत्तीमध्ये फक्त एका दिवसांत १०१ अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास ९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. एका दिवसांत १०१ अब्ज डॉलर्सने संपत्तीत वाढ झाल्यामुळे एका रात्रीत लॅरी एलिसन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. लॅरी एलिसन यांनी त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच जागतिक संपत्तीच्या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं असून त्यांच्या शेअरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, न्यू यॉर्कमध्ये सकाळी १०:१० वाजेपर्यंत लॅरी एलिसन यांची संपत्ती ३९३ अब्ज डॉलर्स एवढी होती, म्हणजेच एलॉन मस्क यांच्या ३८५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती.

आतापर्यंत नोंदवलेली आतापर्यंतची जागतिक संपत्तीच्या क्रमवारीतील सर्वात मोठी ही वाढ आहे. ८१ वर्षांचे लॅरी एलिसन हे ओरेकलचे अध्यक्ष आहेत. त्यांची बहुतेक संपत्ती सॉफ्टवेअर दिग्गज कंपनीमध्ये केंद्रित आहे. दरम्यान, या वर्षी ४५ टक्के वाढलेल्या ओरेकलच्या स्टॉकमध्ये बुधवारी आणखी ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ ठरली आहे. दुसरीकडे २०२५ मध्ये एलॉन मस्क यांच्या टेस्लाचे शेअर्स १३ टक्के घसरले आहेत. कंपनीच्या बोर्डाने मोठ्या प्रमाणात वेतन पॅकेज देण्याची घोषणा केली असली तरी त्यांची आघाडी कमी झाली आहे.

ओरेकलच्या तेजीचे कारण काय?

बुधवारी कंपनीने एआय कंपन्यांकडून क्लाउड सेवांसाठी वाढती मागणी अधोरेखित केल्यामुळे ओरेकलच्या शेअर्समध्ये सुमारे ३३ टक्क्यांनी वाढ झाली. तसेच मंगळवारी विस्तारित व्यापारादरम्यान ओरेकलचे शेअर्स २७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. कंपनीने नुकत्याच संपलेल्या ऑगस्टच्या तिमाहीत तीन क्लायंटबरोबर चार अब्जावधी डॉलर्सचे करार केले आहेत. यामुळे या आर्थिक वर्षात तिचा क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर महसूल ७७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.