देशातील निर्मिती क्षेत्राने मागील अडीच वर्षांतील सर्वाधिक सक्रियता सरलेल्या मे महिन्यात दाखविल्याचे मासिक सर्वेक्षणातून गुरूवारी स्पष्ट झाले. नवीन कामाच्या प्रमाणात आणि उत्पादनांत झालेली वाढ यासाठी कारणीभूत ठरली आहे. देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या ‘एस अँड पी ग्लोबल इंडिया’द्वारे केलेल्या सर्वेक्षणावर बेतलेला निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणारा (पीएमआय) निर्देशांक मेमध्ये ५८.७ गुणांवर पोहोचला आहे. ही मागील अडीच वर्षातील उच्चांकी पातळी आहे. एप्रिलमध्ये हा गुणांक ५७.२ होता. मे महिन्याचा पीएमआय आकडेवारीने सलग २३ व्या महिन्यात एकूण कार्यात्मक परिस्थितीत सुधारणा दर्शविली आहे. म्हणजेच हा निर्देशांक जवळपास दोन वर्षे ५० गुणांपुढे विस्तारपूरकता दर्शविणारा राहिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा म्हणाल्या की, देशांतर्गत नवीन कामाच्या मागणीत झालेली वाढ अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम करीत आहे. बाह्य व्यवसायात वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील भागीदारीला गती मिळून जागतिक बाजारपेठेत भारताची स्थिती सुधारत आहे.

रोजगार भरतीतही मोठी वाढ

जानेवारी २०२१ पासून नवीन कामाच्या मागणीत वेगाने विस्तार होताना दिसत आहे. याचवेळी परदेशी मागणीत सहा महिन्यांत सर्वाधिक वेगाने वाढ होत आहे. नवीन कामाची मागणी वाढल्याने नवीन रोजगार भरतीतही वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२२ नंतरचा रोजगार भरतीचा सर्वाधिक वेग मेमध्ये नोंदवण्यात आला, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

कंपन्या ग्राहकांना जादा शुल्क आकारत असल्याने उत्पादनांची महागाई वाढली आहे. मागणीच्या जोरावर निर्माण झालेली ही महागाई पूर्णपणे नकारात्मक नाही. परंतु तिच्यामुळे क्रयशक्ती कमही होऊन अर्थव्यवस्थेसाठी आव्हाने निर्माण होतात. त्यातून व्याजदर वाढीचे दरवाजे उघडले जातात, असंही एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सचे अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another good news for the economy after gdp growth manufacturing sector hits 31 month high vrd