ॲक्सिस मल्टिकॅप फंडाची सुरुवात ५ डिसेंबर २०२१ रोजी झाली आणि १८ एप्रिल २०२४ फंडाच्या रेग्युलर ग्रोथची ‘एनएव्ही’ १४.४९ आहे. या फंडाची ३१ मार्च २०२४ अखेर मालमत्ता ५,०८१ कोटी होती. फंडाचा मानदंड ‘निफ्टी ५०० मल्टिकॅप ५०:२५:२५ टीआरआय’ आहे. या फंडाचे निधी व्यवस्थापक श्रेयस देवलकर आहेत. फंडाच्या एनएफओमध्ये ‘रेग्युलर ग्रोथ’मध्ये गुंतवलेल्या एकरकमी एक लाखाचे १८ एप्रिल २०२४ रोजी सुमारे १.४४ लाख झाले असून फंडाने स्थापनेपासून वार्षिक १७.८६ टक्के परतावा दिला आहे. फंडाची सुरुवात होऊन दोन वर्षे झाली असली तरी दिनांक १८ एप्रिल रोजी मागील एक वर्षाचा फंडाचा परतावा ५०.५४ टक्के आहे. ॲक्सिस मल्टिकॅप फंडात २० डिसेंबर २०२१ ते २० मार्च २०२४ पर्यंत १० हजार रुपये प्रति महिना एसआयपी केली असता २.८० लाखांच्या गुंतवणुकीचे ३.८८ लाख झाले असून परताव्याचा दर २९.६८ टक्के राहिला आहे.

हा फंड मूलभूत दृष्टिकोनातून (फंडामेंटल रिसर्चनुसार) समभागांच्या वृद्धिक्षम कंपन्यांवर लक्ष केंद्रित करून, ‘बॉटम-अप’ पद्धतीने कंपन्यांची निवड करणारा फंड आहे. बाजार भांडवलाबाबत (मार्केटकॅप) आज्ञेयवादी दृष्टिकोन बाळगून दीर्घकालीन वृद्धिक्षम कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश केला जातो. या प्रक्रियेचा वापर करून समभाग आणि समभागसंलग्न योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. दीर्घकालीन भांडवली लाभ मिळवण्याच्या दृष्टीने समभाग आणि समभागसंलग्न योजनांमध्ये गुंतवणूक करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

हेही वाचा : तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?

म्युच्युअल फंडांकडे विश्लेषक आणि निधी व्यवस्थापकांचा संघ असतो, जो गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत असतो. या संघात प्रत्येकाची भूमिका ठरलेली असते. प्रत्येक विश्लेषक तीन किंवा चार उद्योग क्षेत्रातील निवडक कंपन्यांचे मूल्यांकन करतात आणि त्यातून सर्वोत्तम फंडांच्या उद्दिष्टानुसार कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश करतात. ॲक्सिस म्युच्युअल फंडात, पोर्टफोलिओमधील कंपन्या खरेदी करताना एक गुंतवणूक प्रक्रियेचा अवलंब केला जातो. कंपनीची गुणवत्ता (जसे की व्यवस्थापनाचा दर्जा, वृद्धिक्षमता, उत्पादन किंवा सेवेची किंमत ठरविण्याचे सामर्थ्य (प्रायसिंग पॉवर), व्यवसायाची गुणवत्ता आणि नफा (वाढीचे धोरण) यानुसार कंपनीचा गुंतवणुकीत समावेश होतो. विश्लेषक त्यांच्या विश्लेषणानुसार नवीन कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश करण्याचा किंवा वगळण्याचा प्रस्ताव निधी व्यवस्थापकांसमोर ठेवतात. समभाग विश्लेषक, निधी व्यवस्थापक, सह-निधी व्यवस्थापक यांच्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात येतो. सेबीच्या फंड सुसूत्रीकरणानंतर फंड घराण्याने निधी व्यवस्थापनासाठी काही गोष्टींचे प्रमाणीकरण केले आहे. जसे की लार्ज-कॅप फंड असेल तर, पहिल्या १०० कंपन्यांमध्ये किमान ८० टक्के गुंतवणूक करावी लागते. ॲक्सिस म्युच्युअल फंडाच्या समभाग गुंतवणूक चमूत सध्या आठ फंड व्यवस्थापक आहेत. त्यापैकी काही बाहेरून आलेले तर काहींचे विश्लेषकापासून निधी व्यवस्थापक म्हणून पदोन्नती झालेले निधी व्यवस्थापक आहेत. ॲक्सिस मल्टिकॅप फंडाने ‘अल्फा’ निर्मितीसाठी (निर्देशकसापेक्ष अतिरिक्त नफा) मोठ्या, वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार केला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत २९ फेब्रुवारी २०२४च्या तपशिलानुसार, ४९.४१ टक्के लार्जकॅप, ३८.९४ टक्के मिडकॅप, १०.३१ टक्के स्मॉलकॅप आणि १.३४ टक्के अन्य गुंतवणुका आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत सर्वाधिक गुंतवणूक वाहन आणि वाहनपूरक उद्योग, अभियांत्रिकी आणि भांडवली वस्तू, गैरबँकिंग वित्तीय कंपन्या, किरकोळ दालने (रिटेल) आणि सेवा उद्योगात केली आहे. मल्टिकॅप फंड लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप, या तिन्हींमध्ये गुंतवणूक करतात. फंडाच्या गुंतवणुकीत अनेक कंपन्या आहेत, ज्या त्यांच्या उद्योग क्षेत्रात अव्वल कामगिरी करीत आहे. गेल्या वर्षभरात फंडाने पोर्टफोलिओमध्ये केंद्रित पोर्टफ़ोलिओपासून फारकत घेत वैविध्य आणले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, अर्थव्यवस्थेत उपभोग, गुंतवणूक आणि निर्यातप्रधान उद्योगातील कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. निधी व्यवस्थापाकांनी या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी गुंतवणूक परीघ विस्तृत केला आहे. ज्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक गुंतवणूक झाली आहे. एखाद्या कंपनीचा स्मॉल कॅप ते लार्ज कॅपपर्यंत प्रगतीच्या संपूर्ण कार्यकालात संभाव्य वृद्धी मिळविण्याची सुविधा या फंडात आहे. या दृष्टिकोनाद्वारे फंडाचे उद्दिष्ट सुधारित जोखीम नफा पुनर्संतुलन केले जाते. मल्टिकॅप फंडात सर्व बाजारभांडवल साठ्यातील कंपन्या असल्याने, गुंतवणूकदारांना विविध आकारांच्या कंपन्यांतून गुंतवणूक करण्याची संधी मिळते. याव्यतिरिक्त, गुंतवणूकदारांना अशा पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते, ज्यामध्ये विविध उद्योग क्षेत्रे त्यांची वैशिष्ट्ये राखून आहेत. लार्ज, मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ नकारात्मक जोखीम कमी करू शकतो आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या द्वारे उत्कृष्ट परतावा देऊ शकतो. जे गुंतवणूकदार त्यांच्या मालमत्ता विभाजनाचा एक भाग म्हणून लार्ज, मिड आणि स्मॉलकॅपमध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक करून संपत्ती निर्मिती करू इच्छितात, त्या गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन एसआयपी गुंतवणुकीच्या माध्यमातून संपत्ती निर्मितीसाठी हा एक आदर्श पर्याय आहे. जे किमान ५ वर्षांसाठी एसआयपी करू इच्छितात, अशा गुंतवणूकदारांसाठी ॲक्सिस मल्टिकॅप फंड त्यांच्या गुंतवणुकीच्या गरजांसाठी योग्य असल्याने गुंतवणूकदारांनी त्यांच्या म्युच्युअल फंड वितरकांशी किंवा आर्थिक सल्लागारांशी सल्लामसलत करून या फंडाचा समावेश आपल्या गुंतवणुकीत करावा.

  • shreeyachebaba@gmail.com