बँकेचा इतिहासात बघताना त्यात देवालयाची भूमिकादेखील दुर्लक्षित करून चालणार नाही. सुरुवातीला जेव्हा लोकांकडे पैसे साठू लागले, तेव्हा त्यांनी सुरुवातीला देवालयाचा मार्ग अनुसरला. कारण त्यांच्या मते देवळात म्हणजेच चर्चमध्ये पैसे सुरक्षित राहतात. पण नंतर जेव्हा बँकांचा उदय झाला तेव्हा चर्चचे पैसे सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण म्हणून महत्त्व कमी होऊ लागले. त्या काळातील युरोपातील सधन वर्गाचे पैसे सुरक्षित ठेवणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट होते आणि गरज असेल तेव्हा कर्ज घेणे. या दोन्ही गोष्टी बँका चांगल्या प्रकारे करू लागल्या होत्या.
सोळाव्या आणि सतराव्या शतकामध्ये बँकांना त्यांचा खरा मार्ग सापडला आणि ते बँकिंगमधील महत्त्वाची कामे करू लागले. जसे की, ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, चलनाचे विनिमय आणि निधी हस्तांतर करणे. गेल्या लेखात बघितल्याप्रमाणे आम्सटरडॅम शहरातील बँकेने ती म्हणजे बँक ऑफ आम्सटरडॅमने देशातील मध्यवर्ती बँकेची संकल्पना रुजवली. मात्र यावेळी लंडनमधील बँकादेखील काही मागे नव्हत्या. सतराव्या शतकात श्रीमंत व्यापाऱ्यांनी त्यांचे सोने व चांदी लंडनमधील सोनारांकडे जमा करायला सुरुवात केली. ते हे सोने ठेवण्याचे पैसे घेत असत आणि त्याचबरोबर एक पावतीदेखील देत असत, ज्यात सोन्याची शुद्धता आणि वजन लिहिलेले असे. या पावतीनेच लॉकरमधील सोने परत मिळू शकत असे. म्हणजे या पावत्या एक प्रकारे प्रॉमिसरी नोट्स म्हणून काम करू लागल्या आणि नंतर मध्यवर्ती बँकेने नोटा छापण्याचे अधिकार आपल्या आधिपत्याखाली घेतले. म्हणजे सोन्यासारख्या धातूच्या किमतीचे रूपांतर छोट्या कागदात झाले.
ही एक सुरुवात होती ती परक्राम्य दस्तावेज म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटची. तसा नोटा छापण्याचा इतिहास अजून जुना आहे. म्हणजे अगदी पंधराव्या शतकात चीनमध्ये याची सुरुवात झाली, पण आधुनिक व्यवहाराचे श्रेय मात्र ब्रिटिशांनाच जाते. १७६० पासून सुरू झालेली औद्योगिक क्रांती बँकिंग व्यवहारामध्येदेखील दिसू लागली आणि इंग्लंडमधील बँकांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यांनी अजून बरेच काही बदल केले जसे की ”चेक” किंवा ”डिमांड ड्राफ्ट”. दिलेल्या ”चेक” ला एका मध्यवर्ती ठिकाणी येऊन एका निरीक्षकाद्वारे प्रत्यक्ष पैसे देऊन व्यवहार पूर्ण केला जात असे, यातूनच क्लिअरिंग हाऊसची लंडनमध्ये सुरुवात झाली.
बँकिंग सेवांचा पुढे आणखी विस्तार करण्यात आला. १८६१ मध्ये लंडनमध्ये पोस्टल सेव्हिंग म्हणजे गरीब लोकांना त्यांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याच्या सुविधेला सुरुवात झाली. तोपर्यंत बँक म्हणजे केवळ श्रीमंतांचीच मक्तेदारी होती. गरिबांना त्यांचे पैसे कुणाकडे तरी किंवा स्वतः जपून ठेवावे लागायचे. पुढे सर्वच देशांनी अगदी भारतानेदेखील या पोस्टल सेव्हिंग योजनेला सुरुवात केली. बँका आणि त्यांच्या संबंधित अजूनही काही रंजक गोष्टी आहेत, त्या पुढील भागात जाणून घेऊया.