Nikhil Kamath Success Story Of Zerodha: झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी एका पॉडकास्टमध्ये त्यांचे भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी अधिकारांची विभागणी, अहंकार कसा हाताळतात आणि त्यांचा अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय कसा स्थिर ठेवतात यावर प्रकाश टाकला आहे.
यावेळी निखिल कामथ यांनी स्पष्ट केले की, “आम्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी करतो.” निखिल शेअर बाजार आणि गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतात, तर भाऊ नितीन उत्पादन, ब्रोकिंग आणि मनुष्यबळ हाताळतात.
पुढे बोलताना निखिल म्हणाले की, “आम्ही एकमेकांच्या कामात कधीच अडथळा आणत नाही आणि यामुळेच आमच्यातील संबंध उत्तम आहेत.”
परंतु सौहार्दाला रचना असावीच लागते. सुरुवातीपासूनच या भावंडांनी आपली व्यावसायिक भागीदारी औपचारिकतेने सुरू केली. “आमचं सगळं कागदावर होतं. भाऊ असूनही, आम्ही खूप औपचारिक होतो”, असं निखिल यांनी स्पष्ट केलं. यावेळी निखिल यांनी जवळपास १६ वर्षांपूर्वी ‘कामथ असोसिएट्स’ सुरू करतानाच्या दिवसांची आठवणही सांगितली.
या जोडीने व्यवसाय नेहमीच काटकसरीने चालवला. बाहेरील भांडवल घेतलं नाही, कर्ज टाळलं आणि झेरोधा पारंपरिक पद्धतीने वाढवली. “आम्ही हा व्यवसाय आधुनिक कंपन्यांच्या दिखाव्यात पारंपरिक ‘बनिया’ पद्धतीने चालवला”, असे निखिल म्हणाले.
या सर्व गोष्टी असल्या तरीही, त्यांच्यात वाद होतात. याबाबत निखिल कामथ म्हणाले की, “असे काही वेळा होते जेव्हा अहंकार जागा होतो. काही वेळा गैरसमज होतात. यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही कामाची विभागणी केली आहे. शेअर बाजार, गुंतवणूक किंवा व्यापाराशी संबंधित निर्णय घ्यायचा असेल तर तो मी घेतो आणि उत्पादन, मनुष्यबळ किंवा ब्रोकिंगबाबतचे निर्णय नितीन घेतो.”
प्रत्येकाने काय आणि कोणते काम करायचे आहे, याबाबतचा स्पष्टपणा, परस्पर सन्मान आणि निश्चित भूमिका यांमुळे झेरोधा, इतर अनेक कंपन्यांच्या सह-संस्थापकांमधील अनेकदा दिसणाऱ्या गोंधळाशिवाय वाढू शकली. व्हेंचर कॅपिटलवर चालणारे स्टार्टअप्स भरमसाठ खर्च करत असलेल्या काळात, कामथ बंधूंनी स्वत:च्या भांडवलावर नफा कमवणारा व्यवसाय उभारला आहे.